Friday, March 29, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखपाकिस्तानचा बुरखा फाटला पण?

पाकिस्तानचा बुरखा फाटला पण?

पाकिस्तानने कुलभूषण जाधव  कुटुंबियाच्या भेट प्रकरणी केलेल्या नौटंकीने पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाटला. कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबाला मानवता आणि सद्भावनेच्या आधारे भेटीची परवानगी दिल्याचे सांगणाऱ्या पाकिस्तानने मानवताही दाखवली नाही आणि सद्भावनाही नाही अशी टीका परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज  यांनी केली. कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीचं मंगळसूत्र उतरवलं, त्यांच्या चपला, कपडे बदलायला लावणं हा जाधव कुटुंबाचा नव्हे तर भारतातील १३० कोटी जनतेच्या आई-बहिणीचा अपमान आहे. अशी टीका राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी केली. सरकारशी आमचे राजकीय मतभेद असू शकतात. मात्र देशाच्या प्रतिष्ठेचा, आया-बहिणींच्या इज्जतीचा प्रश्न येतो, तेव्हा आम्ही ते सहन करणार नाही. असा संताप व्यक्त केला. गेल्या चार दिवसा पूर्वी जाधव कुटुंबिया सोबत पाकिस्तानने जो प्रकार केला त्याच्यावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. संसदेमध्ये आजही गदारोळ झाला. सत्ताधारी टीकेपलिकडे दुसरे काहीच करत नाही हे स्पष्ट झाले. खरतर भारत सरकारच्या दुबळेपणामुळे पाकिस्तानने मस्तवालपणा केला. व जाधव कुटुंबियाचा एकाप्रकारे छळ केला. कुलभूषण प्रकरणातून पाकिस्तानने कोटय़वधी भारतीयांच्या भावनांचाही विचार करणे आवश्यक होते. तसे न करता त्याचा केवळ प्रोपगंडा या हेतूने वापर करण्यात आला. हे सर्व केल्यानंतर त्या दुखावलेल्या भारतीय भावनांचा परिणाम भारत-पाक संबंधांवर होणार नाही असे पाकिस्तानी मुत्सद्दय़ांना वाटत असेल, तर ते मूर्खाच्याच नंदनवनात राहात आहेत असे म्हणावे लागेल. परंतु यात पाकिस्तानी परराष्ट्र खात्याचीही चूक नाही. कुलभूषण प्रकरणाचा उद्गमच मुळी भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनामी करण्याच्या हेतूंमधून झाला असल्याने आणि त्यामागे पाकिस्तानी लष्कराचा हात असल्याने, त्यांच्या परराष्ट्र खात्याच्या हातातही काही उरलेले नाही. पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय या संघटनेच्या षड्यंत्राची चाके फिरवत राहणे याशिवाय त्यांच्यासमोर अन्य पर्याय नाही. भारताच्या बदनामीचे आणि कुलभूषण जाधव हे त्यातील केवळ एक प्यादे आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे. काश्मिरातील हिंसाचार, मुंबईवरील दहशतवादी हल्ला अशा अनेक घटनांमधील पाकिस्तानच्या आयएसआयचा सहभाग लपून राहिलेला नाही. स्वत:ला दहशतवादाचा बळी म्हणवून घेणे हा पाकिस्तानचा आवडता छंद आहे. तसे रडगाणे गायले म्हणजे अमेरिकेबरोबरच विविध पाश्चात्त्य देश आपले सांत्वन करण्यास डॉलर घेऊन येतात हेही पाकिस्तान पूर्वीपासूनच ओळखून आहे. कुलभूषण यांचा ‘रॉ’शी काहीही संबंध नसल्याचे भारताने वारंवार स्पष्ट केले असूनही पाकिस्तानने त्यांच्याविरोधात लष्करी न्यायालयात खटला चालवला. त्या न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. हे करताना सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय संकेतांचा पाकिस्तानने भंग केला आहे. कोणत्याही परदेशी नागरिकाला अटक झाल्यानंतर तो नागरिक असलेल्या देशाच्या संबंधित राजनैतिक अधिकाऱ्यांना त्याची भेट घेऊ देणे हा एक साधा संकेत. पण २५ मार्च २०१६ ते ३१ मार्च २०१७ या काळात तब्बल १३ वेळा मागणी करूनही पाकिस्तानने भारतीय अधिकाऱ्यांना कुलभूषण यांना भेटू दिले नाही. दरम्यानच्या काळात भारताने हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेले. तेथे पाकिस्तानला मोठी चपराक मिळाली. कुलभूषण यांच्या फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्यात आली. यातून आपलीच बदनामी होत आहे, दुसरीकडे अमेरिकेसारखा देशही आपल्याबाबत साशंक आहे हे सगळे पाहून पाकिस्तानने कुलभूषण यांच्या आईला व पत्नीला त्यांच्या भेटीची परवानगी दिली. त्यासाठी निवडण्यात आलेली वेळही लक्षणीय आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेला हाफिज सईद मोकाट सुटलेला आहे. तो पाकिस्तानी राजकारणात घुसू पाहात आहे. या घटनेवरून जगाचे लक्ष उडविण्यासाठी कुलभूषण प्रकरण हुशारीने माध्यमांमध्ये आणण्यात आले, यात जशी शंका नाही, तशीच त्याचा वापर पाकिस्तान प्रोपगंडासाठी करणार यातही शंका नव्हती. त्यांनी तो तसा केलाही. त्याच्या सुटकेसाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करण्यात येत असल्याची ग्वाही परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे. पण अखेर गुण प्रयत्नांना मिळत नसतात. ते मिळतात परिणामांना. देशवासीयांना प्रतीक्षा आहे ती त्यांची, कुलभूषण यांच्या सुटकेची. परंतु भारताने संसदेत फक्त चर्चा करुन कुलभूषणच्या सुटकेचा प्रश्न सुटणार नाही तर यासाठी मोठा दबावतंत्र तयार करुन त्याची सुटका करुन लढाई जिंकावी लागेल. मात्र पाकिस्तान सध्या मस्तवालपणा करत आहे त्यालाही चोख उत्तर देणे गरजेचे आहे. तरच ५६ इंचच्या छातीचे पंतप्रधान काही तरी करु शकतात असा विश्वास जनतेचा बसेल.

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments