Saturday, April 20, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखदरोडेखोरांची ‘लयलूट’!

दरोडेखोरांची ‘लयलूट’!

पेट्रोल,डिझेलच्या किंमती वाढवून जनतेची लूट करणाऱ्या दरोडेखोर सरकारने नंगानाच सुरु केला आहे. युपीएच सरकार असतांना पेट्रोल,डिझेलच्या किंमतीवरून स्मृती इराणी,मुक्तार अब्बास नकवी,व्यंकय्या नायडू हे बोंबलत होते. त्यांचे जुने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता सत्तेत असल्यामुळे ही मंडळी मुग गिळून गप्प बसली आहे. यांना आता महागाई दिसत नाही. जनतेला यांच सरकार लुटत नाही का? आज महागाईवरुन जनता हैराण असतांना हे सरकारच अपयश झाकण्यात मश्गुल आहेत. महागाईवरुन गल्ली पासून दिल्लीपर्यंतच्या नेत्यांचे तोंड बंद आहेत. विरोधी पक्षात असतांना मोर्चे काढणारी ही नौटंकी मंडळी सत्तेत बसून तमाशा बघत आहेत. यांना आता जनतेची चिंता नाही. सत्तेची मलाई खाणारी ही मंडळी गप्प का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेलाही पडला आहे. विरोधी बाकावर असतांना कोणत्याही गोष्टीला विरोध करणारी नौटंकीबाज कंपनी आता सत्तेत आहेत ना? दररोज महागाईवरुन जनता होरपळत चालली. मात्र समाजातव्देश पसरवुन वाद निर्माण करण्यापलीकडे कोणतही काम देशात होत नसल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. राज्यात प्रतिलिटर पेट्रोलचे दर ८२ तर डिझेलचे दर ६९ रुपये झाले आहेत. मे २०१४ नंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती ३०% ने कमी झाल्या आहेत पण देशात आणि राज्यात इंधनाच्या किंमती मात्र वाढतच आहेत. वर्षभरात पेट्रोल ७ तर डिझेल ४ रुपयांनी महागले आहे. पेट्रोलच्या किंमतीच्या ४८.२ टक्के तर डिझेलच्या किंमतीच्या ३८.९  टक्के उत्पादन शुल्क आणि व्हॅट ची आकारणी केली जाते. २०१४ साली पेट्रोलवर प्रतिलिटर ९.२ लिटर उत्पादन शुल्क आकारले जात होते. गेल्या तीन वर्षात त्यात वाढ करून आता १९.४८ उत्पादन शुल्क वसूल केले जात आहे. तर डिझेलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर ३.४६ रूपयांवरून वाढवून ती १५.३३ रू. प्रति लिटर केले आहे. त्यामुळे “अब की बार महंगाई की मार” अशी परिस्थिती झाली आहे. सरकारने इंधनदरवाढ करून सर्वसामान्यांची लूट चालवली आहे. राज्य सरकारनेही पेट्रोल डिझेलवर विविध कर आणि सेस लावले आहेत त्यामुळे गोवा कर्नाटक या शेजारील राज्यांपेक्षा महाराष्ट्रात इंधनाचे दर खूप जास्त आहेत. या दरवाढीमुळे महागाईचा भडका उडणार असून सर्वसामान्यांना याचा मोठा आर्थिक त्रास सहन करावा लागणार आहे. महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सर्वसामान्यांची फसवणूक केली आहे. सरकारने पेट्रोल डिझेलला GST च्या कक्षेत आणून तात्काळ इंधनाच्या किंमती कमी करायला हव्यात. मात्र सत्ताधाऱ्यांनी लुटालूटीचा खेळ सुरु केल्यामुळे जितका पैसा जनतेकडून काढता येईल तितका पैसा काढायच जणू काही शपथ घेऊन टाकली. महागाईवरुन जनता सध्या शांत आहे. ज्या दिवशी जनता रस्त्यावर उतरेल त्या दिवशी सरकारला जाग येईल सध्या तरी असेच चित्र निर्माण झाले आहे.

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments