Wednesday, April 17, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखनाणारचा ‘युतीत’ तमाशा!

नाणारचा ‘युतीत’ तमाशा!

नाणार प्रकल्पावरुन शिवसेना भाजपाचा कित्येक महिण्यांपासून आतून किर्तन बाहेरुन तमाशा सुरु आहे. प्रकल्पाचा तमाशा करुन आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्याच्या कामापलीकडे काहीच होतांना दिसत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण करत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेनेही प्रकल्पाला विरोध केलेला आहे. शिवसेनेने नाणारला विरोध करुन प्रतिष्ठेचा मुद्दा केला. भाजपाने प्रकल्प होणारच अशी भूमिका घेतली. मात्र आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाषा बदलली. मुख्यमंत्री फडणवीस आता बोलत आहेत जनतेचा कौल घेऊन निर्णय घेऊ. परंतु ही भाषा अचानक का बदलली तर त्याला एकमेव कारण आहे. शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढून घेतला तर सरकार कोसळून जाईल अशीही भीती भाजपच्या मनात आहे. कोकणात विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात एन्रॉन वीजनिर्मिती प्रकल्प आला. त्यानंतर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प. आणि आता नाणार तेलशुद्धिकरण प्रकल्प. कोणत्याही प्रकल्पाला विरोध करणे जणू हा आमचा जन्मसिध्द हक्क आहे. कोकणात विरोध झाला. अगदी अरबी समुद्रात बुडवण्याच्या डरकाळ्या फोडल्या. पुढे जादूची काडी फिरल्यासारखं विरोध करणाऱ्यांची मनं बदललीत. एन्रॉन कोकणाच्या मानगुटीवर बसलं. मात्र कधीच त्याचा लाभ महाराष्ट्राला तर सोडा पण कोकणालाही मिळाला नाही. देशतर दूरच राहिला. उलट वित्तीय संस्थांचाही पैसा अडकला. आजही एन्रॉनचा प्रकल्प ओस पडला. तो पुन्हा सुरु व्हावा यासाठी म्हणावे तसे प्रयत्न झालेले दिसले नाहीत. भूमिपुत्रांनी मात्र जी किंमत मोजायची ती मोजून झाली. आताचा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा वाद. जैतापूर परिसरातील सामान्य मच्छिमारांचा विरोध. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात राबवण्यासाठी टोकाचे प्रयत्न झाले. अगदी बळाचाही नको तेवढा वापर झाला. मच्छिमार तरुणाने गोळीबारात प्राणही गमावले. तेव्हा विरोधात असणारे भाजप शिवसेनेवाले आता सत्तेत. नाणारला विरोध करणारी शिवसेना तेव्हाही तीव्रतेने विरोध करत होती. शिवसेना आजही प्रकल्पाला विरोध असल्याचे सांगत आहे. मात्र प्रत्यक्षात काय? जैतापूर प्रकल्प पुढे रेटलाच गेलेला दिसतोय. आता तिसरा धक्का नाणारचा. तेलशुद्धिकरण प्रकल्पाचा. आशियातील सर्वात मोठा तेलशुद्धिकरण प्रकल्प. लाखभरांना रोजगाराचं आश्वासन. तरीही सभोवतालचा गावांचा विरोध आहे. १५ हजार एकर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. त्यामुळे १४ गावांना सरळ फटका बसणार. तोही असा तसा नाही, संपूर्ण संपवणाराच. त्यांनी दिलेली आकडेवारी धक्कादायकच. प्रकल्पासाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनीवर १२ लाख ६४ हजार हापूसची, ६ लाख १३ हजार काजू, नारळ, सुपारी यांची झाडे आहेत. ती जाणार. किमान ४५ हजार विस्थापित होणार. ८.५ हजार कुटुंबांवर विस्थापनाचा बुलडोझर चालणार. ५.५ हजार घरे-गोठे नाहीसे होतील. त्यामुळेच गावकरी विरोधासाठी अगदी टोकालाही जाण्यास तयार आहेत. आमचा आंबा आम्हाला वर्षभर सुखानं जगवतो, तो कापून तुम्ही आम्हाला काही लाख देणार असाल तर नकोच आम्हाला. ही त्यांची भूमिका त्यामुळे पटते. “आजवर कोकणात शेतकरी आत्महत्या नाहीत. मात्र भात, आंबे, काजू, मासे यांच्यावर सुखानं जगणाऱ्या कोकणाभोवती एकामागोमाग एक विनाशकारी प्रकल्पाचा विळखा पडत राहिला. तर सारंच संपेल. निसर्गानं  दिलेली संपन्नता करपून जाईल.” नाणारमधील प्रस्तावित तेलशुद्धिकरण केंद्राची क्षमता ६ कोटी मेट्रिक टनाची आहे. मात्र त्यामुळे प्रत्येक वर्षाला १ कोटी मेट्रिक टन कार्बन डाय ऑक्साईड, ५५०० मेट्रिक टन सल्फर डाय ऑक्साइड, ७२,२७० मेट्रिक टन नायट्रोजन ऑक्साईडचे उत्सर्जन होऊ शकते. त्याचा पर्यावरणावर प्रचंड विनाशकारी दुष्परिणाम होईल. बागायत, मासेमारी पर्यायानं पर्यटनही संपून जाईल. सध्या नाणारचा प्रकल्प कोकणात नकोतर विदर्भात आणा असं विदर्भातील आमदार सांगतात. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही सांगतात, मुख्यमंत्र्यांनी खुशाल विदर्भात न्यावा. तर भाजपाचे नेते भीती दाखवतात, येथून गेला तर गुजरातमध्ये जाईल. स्थानिक आंदोलक आणि पर्यावरण अभ्यासकांची ही माहिती पाहिल्यानंतर कोकणासाठी हा प्रकल्प विनाशकारी ठरण्याची भीती योग्य वाटते. मात्र हा प्रकल्प रद्द झाला तर याचा राजकीय फायदा शिवसेनेला मोठ्या प्रमाणात कोकणात मिळेल.

वैदेही तामण
मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments