Friday, March 29, 2024
Homeसंपादकीयअग्रलेख...आता तरी धडा घ्या!

…आता तरी धडा घ्या!

२०१९च्या लोकसभा निवडणुकांकडे देश वेगाने वाटचाल करतोय. नुकताच ग्रामपंचायत निवडणूकांचा निकाल हा भाजपाच्या दृष्टीकोनातून चिंताजनक तर काँग्रेसला नवसंजीवनी देणारा आहे. हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे आणि गुजरातच्या निवडणुका तोंडावर असताना आलेले हे पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघासह अन्य काही निकालांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आत्मचिंतनाची गरज असल्याचे स्पष्ट झाले. अभिनेते विनोद खन्ना यांनी गुरुदासपूरमधून भाजपकडून १९९८, १९९९, २००४ आणि २०१४ अशा चार वेळा निवडणूक जिंकली होती. २००९ मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. पंजाबमध्ये सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवून राज्यात सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची विजयी पताका या पोटनिवडणुकीतही कायम राहिल्याचे दिसून येते. या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे सुनील जाखड यांनी भाजपच्या स्वर्ण सलारिया यांचा पराभव केला. २०१४च्या निवडणुकीतील मतांची तुलना केली, तर काँग्रेसची मते दीड लाखांनी वाढली आहेत आणि भाजपची मते पावणेदोन लाखांनी कमी झाली आहेत. यावरून भाजपा विरोधात जनधार वाढत चालला, याचा अंदाज येऊ शकतो. भाजपची पारंपरिक जागा असतानाही पक्षाने उमेदवार निवडीपासून प्रचारापर्यंत अनेक पातळ्यांवर येथे उदासीनता दाखवली. आम आदमी पक्षाची मतेही पावणे दोन लाखांवरून अवघ्या तेवीस हजारांपर्यंत आली आहेत, यावरून लोक पुन्हा राष्ट्रीय पक्षाच्या पर्यायाकडे वळू लागल्याचे दिसून येते. नोटाबंदीचे दुष्परिणाम गेल्या काही महिन्यांमध्ये समोर येऊ लागले आहेत आणि जीएसटीमुळे त्रस्त झालेल्या व्यापाऱ्यांचा आक्रोशही तीव्र बनत आहे, या सगळ्याचा परिणाम वेगवेगळ्या निवडणुकांमधून दिसून येतोय. महाराष्ट्रातील नांदेड महापालिका निवडणुकीतील भाजपचे पानिपत त्याचेच निदर्शक होते. गुरुदासपूरच्या निकालातही ते प्रतिबिंबित झाले. केरळमधील वेंगारा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटच्या (यूडीएफ) के एन ए कादर यांनी डाव्या आघाडीच्या पी. पी. बशीर यांचा पराभव केला. गेले काही महिने भाजपने केरळमध्ये सगळी ताकद लावून हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. परंतु तीस हजार हिंदू मतदार असलेल्या या मतदारसंघात भाजपला अवघी साडेपाच हजार मते मिळाली. गेल्यावेळच्या निवडणुकीत मिळालेल्या भाजपच्या मतांमध्येही दीड हजारांची घट झाली आहे. भाजपने कितीही आकांडतांडव केले, तरी केरळमधील जनता त्यांना भीक घालायला तयार नाही, हेच यावरून दिसून येते. अलाहाबाद विद्यापीठाच्या विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकीचे निकालही याच सुमारास आले आणि त्यामध्ये भाजपप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला पराभव पत्करावा लागला. समाजवादी पक्षाची विद्यार्थी शाखा असलेल्या समाजवादी छात्र सभेने पाचपैकी चार जागांवर विजय मिळवला. दिल्लीतील जेएनयू, दिल्ली विद्यापीठापाठोपाठ अलाहाबाद विद्यापीठातील विद्यार्थ्यांनीही अभाविपला नाकारले, यावरून तरुण वर्गही उजव्या पक्ष-संघटनांपासून दुरावू लागल्याचे स्पष्ट होते. या सगळ्या निवडणुका छोट्या असल्यामुळे त्यावरून काही ठोस निष्कर्ष काढणे घाईचे ठरू शकेल. परंतु अगदी वर्षभरापूर्वीपर्यंत सगळीकडे भाजपचे वारे वाहात असल्याचे जे चित्र निर्माण करण्यात आले होते, ते तसे राहिले नाही, आता तरी भाजपाची मंडळी धडा घेतील का? हाच खरा प्रश्न आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments