Friday, March 29, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखती महिलाही दोषीच!

ती महिलाही दोषीच!

‘सदरक्षणाय, खलनिग्रहणाय…’ असे ब्रीद पोलिसांच्या खाकी वर्दीवर लावलेले आहे. याचा अर्थ सामान्य जनतेला सुरक्षित ठेऊन ‘खल’वृत्तीने वागणाऱ्यांना ठेचण्याचे काम पोलिसांनी करणे अपेक्षित आहे; परंतु पोलिसही वर्दीचा काही वेळा चुकीचा वापर करतात. काही वेळा नाहक पोलिसांनाही बळीचा बकरा बनला जात असल्याची घटना समाजात घडत असेल तरी गंभीर व संतापजनकच. मालाडमध्ये एक महिला गाडीत बसून बाळाला स्तनपान करत असताना तिची गाडी टो करुन नेत असल्याचा व्हिडिओ समोर आला आणि एकच थयथयाट झाला. या घटनेनंतर सोशलमिडयावर त्या व्हिडिओवरुन नेटीजन्सने आक्षेप घेतल्यामुळे सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. एका पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले. त्यानंतर या घटनेचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये गाडी टो करताना संबंधित महिलेकडे बाळ नसल्याचे दिसून आले. त्यामुळे या प्रकरणाची दुसरी बाजू समोर आली आहे. कार टोईंगवेळी ‘त्या’ महिलेकडे बाळ नव्हतं? मात्र पोलिसांनी गाडी टो केल्यावर महिलेने कुटुंबीयांकडून बाळाला गाडीत घेतले. हा नवा व्हिडिओ आणि त्यातील घटना, कालच्या व्हिडिओतील घटनेच्या विरुद्ध आहेत. ‘बाळाला स्तनपान करताना पोलिसांनी गाडी टो केली. त्यांनी मला गाडीतून बाहेर पडा, असे सांगण्याचीही तसदी घेतली नाही,’ असे त्या ज्योती नामक महिलेने आरोप केला होता. राष्ट्रीय महिला आयोगाने या सर्व प्रकरणावर भाष्य करताना दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे म्हटले होते. मात्र या घटनेत महिलेचे वर्तनही बेजबाबदार असल्याने तिच्यावरही गुन्हा दाखल करावा, असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मांनी म्हटले होते. ‘गाडी टो होत असताना महिला गाडीत बसून राहिली. त्यामुळे तिने बाळाचा जीव धोक्यात घातला,’ असे शर्मा यांनी म्हटले आहे. खरतर महिला आयोगाने जी भूमिका मांडली ती योग्यच आहे. प्रसारमाध्यमांनीही महिलेच्या बाजूने एकतर्फी माहिती घेत पोलिसांना चांगलेच झोडपले.  या प्रकरणी कॉन्स्टेबल शशांक राणेला शनिवारी निलंबित करण्यात आले. वाहतूक शाखेचे पश्चिम उपनगर विभागाचे उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांनी अहवाल सादर केल्यानंतर सहआयुक्त अमितेशकुमार यांनी त्याचे निलंबन करत विभागीय चौकशीचे आदेश दिले होते. खरा प्रश्न आहे की, सोशल मिडियावर अर्धवट चुकीचे व्हिडीओ व्हायरल करुन त्याचा गैरफायदा घेतला जात असेल तर तो प्रकार अतीगंभीर आहे. महिला आहे म्हणून काही अधिकार जास्त देणे व महिलांनी आरोप केले ते प्रमाणित करुन इतर पुरुषांवर कारवाई करणे हे चुकीचे आणि निषेधार्य आहे. असत्य घटनेला सत्य समजून व अर्धवट माहितीच्या आधारे पोलिसावर कारवाई होत असेल तर पोलिसांनी काम करावे कसे? असा प्रश्न निर्माण होतो. याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे. चुकीची कामे करणाऱ्यांवर पोलिस कारवाई करत असतील आणि त्यांच्यावर कारवाई होत असेल तर तेही कारवाई करतांना भितीपोटी दुर्लक्ष करतील. यामुळे पोलिसांचाही धाक उरणार नाही. ही समाजासाठी चिंतेची गोष्ट आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments