Friday, April 19, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखआव्हानात्मक "राजकीय" आखाडा!

आव्हानात्मक “राजकीय” आखाडा!

चित्रपट अभिनेत्यांनी तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश करण्याची परंपरा तशी जुनीच आहे. करुणानिधी, एमजीआर, जयललिता, विजयकांत अशा कित्येक कलाकारांनी चित्रपटातून सुरु केलेली कारकीर्द राजकीय आखाड्यापर्यंत नेली. या यादीत आणखी दोन कलाकारांची नाव जोडली जाणार आहेत. एक म्हणजे थलैवा अर्थात सुपरस्टार रजनीकांत आणि दुसरा कमल हासन. रजनीकांत जरी चित्रपटात सुपरस्टार ठरला असला तरी राजकीय आखाडा हा त्याच्यासाठी आव्हानात्मक आहे. रजनीकांतचा ज्या वेळी प्रश्न उपस्थित होईल त्यावेळी तामिळनाडूच्या अस्मितेचा,तिथल्या मातीचा आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतील. तामिळनाडूच्या तत्कालिन मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर राज्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. रजनीकांतचा राजकीय पक्ष हा इतर पक्षांसाठी धोकादायक ठरेल असे सांगणे थोडे घाईचे होईल. कारण रजनीकांतचा मागचा इतिहास बघता त्यांना अपयश आलेले आहेत. त्यांचे जुने वक्तव्य आणि राजकीय चुळबूळ ही अपयशीच ठरली. रजनीकांत यांनी २१ वर्षांपूर्वी १९९६ मध्ये विधान केले होते की, ‘जर जयललिता जिंकल्या, तर देवही तामिळनाडूला वाचवू शकत नाही’. त्यानंतर अण्णाद्रमुकचा सपाटून पराभव झाला होता. त्यावेळी रजनीच्या विधानातील ताकद पाहायला मिळाली होती. हा अपवाद सोडून दिला तर १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये रजनीकांतने भाजपला समर्थन दिलं होतं, मात्र भाजप फारशी कमाल दाखवू शकला नाही. त्यावेळी मात्र एआयएडीएमकेने ३०, तर द्रमुकने ९ जागा जिंकल्या होत्या. २००४ मध्ये रजनीकांत यांनी पीएमकेला मतदान करण्याचं आवाहन केलं, मात्र पक्षाला एकही जागा मिळाली नाही. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकांपूर्वी मोदींनी रजनीकांतची भेट घेतली होती. देशात भाजपला बहुमत मिळालं असलं, तरी तामिळनाडूत भाजपला फारशी चमक दाखवता आली नाही. तामिळनाडूच्या राजकारणात एन्ट्री घेत रजनीकांत यांनी हादरे देण्याचा प्रयत्न केला खरा, पण तो कितपत यशस्वी होणार, हे येत्या काळात पाहायला मिळेल. रजनीकांत यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत असलेले जवळचे संबंध पाहता, रजनीकांत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र ज्या राज्यात भाजपचं अस्तित्वच नाही, तिथे रजनीकांत भाजपला पाठिंबा कसा देणार, असा प्रश्न होता. त्यातच रजनीकांत यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची घोषणा करुन अनेकांना धक्का दिला. एआयएडीएमकेच्या प्रमुख जयललिता यांच्या निधनानंतर राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. द्रमुकचे सर्वेसर्वा करुणानिधी यांच्या वयोमानामुळे तेही राजकीयदृष्ट्या सक्रीय नाहीत. त्यामुळे रजनीकांत यांचा राजकीय उदय आशादायक मानला जात आहे. परंतु रजनीकांत यांचा राजकीय इतिहास पाहता, जनतेने त्यांना नाकारलंच आहे. अभिनेता म्हणून चाहत्यांनी त्यांना जितकं भरभरुन प्रेम दिलं, तितकंच राजकीय पटलावर त्यांना झिडकारलं गेलं.  १९७५ मध्ये रजनीकांत यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीस सुरुवात केली. १९७८ मध्ये त्यांना चित्रपटात प्रमुख भूमिका मिळू लागल्या. कमल हसन हे बुद्धीप्रामाण्यवादी तर, रजनीकांत हे देवावर प्रचंड श्रद्धा असणारे व्यक्तिमत्व. काही दिवसांपूर्वी कमल हसन यांनी केशरी हा आपला रंग नसल्याचे सांगत आपला भविष्यातील प्रवास कसा असेल याचे संकेत दिले होते. रजनीकांत यांची भाजपशी असलेली जवळीक लपून राहिलेली नाही. नोटाबंदीनंतर रजनीकांत यांनी मोदी यांची प्रशंसा केली होती. राजकारणातील आपली नवी इनिंग सुरु करणाऱ्या कमल हसन आणि रजनीकांत यांनी स्वच्छ आणि पारदर्शी कारभार करणारे सरकार देण्याचे वचन दिले आहे. मावळत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी आपल्या समर्थकांशी बोलताना रजनीकांत म्हणाले की, तुम्ही मला खूप पैसा आणि प्रसिद्धी दिली आहे. मला अपेक्षाही नव्हती एवढे तुम्ही मला प्रेम दिले आहे. पैसा आणि प्रसिद्धीसाठी मी राजकारणात येत नाही. मला सत्तेची इच्छाही नाही. १९९६ मध्ये मला तशी संधी आली होती. पण, मी ही संधी नाकारली. त्यावेळी मी ४५ वर्षांचा होतो. आता ६८ वर्षांचा आहे. आता मी तशी इच्छा का बाळगू? असा प्रश्न केला होता. खरतर अभिनेता म्हणून तामिळनाडूच्या जनतेने रजनीकांतला डोक्यावर घेतले होते. रजनीकांत त्यांच्यासाठी चित्रपटातील देव आहे. चित्रपटातील अभिनय आणि राजकीय कारकीर्द यातील तुलना होऊ शकत नाही. राजकीय डावपेच हे वेगळे असतात जो या डावपेचात जिंकला तो राजकीय लढाई जिंकतो यासाठी त्याला राजकीय पाठबळ,साम,दाम,दंड भेद या सर्व गोष्टींचा मिलाफ करावा लागतो. शेवटी जनतेच्या मनात काय असतं हे सांगणे सध्या तरी अशक्य आहे. अण्णाद्रमुक, द्रमुक ने रजनीकांतच्या राजकीय प्रवेशामुळे आव्हान नसल्याचे स्पष्ट केले आहे. शेवटी रजनीकांतसाठी राजकीय आखाडा तितका सोपा नाही हे विसरुन चालणार नाही.

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments