Thursday, April 25, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखउध्दवांची पुन्हा गुरगुर!

उध्दवांची पुन्हा गुरगुर!

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसेना स्वबळावरच लढणार असल्याची गुरगुर आज पुन्हा केली. यापूर्वीही त्यांनी स्वबळाचीच घोषणा केली होती. शिवसेना, भाजपा सत्तेत एकत्र आहेत. परंतु एकमेकांवर दोन्ही पक्ष भुंकण्याचे सोडत नाहीत. शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी भाजपा सोबत युती अजिबात नाही असे औरंगाबादेत सांगितले परंतु त्याच्यावर किती विश्वास करायचा हा संशोधनाचा विषय आहे. खरतर निवडणूका जवळ आल्यामुळे शिवसेना,भाजपा हे आपआपली ताकद एकमेकांना दाखवत आहेत. परंतु भाजपाने लाचारी पत्कारल्यामुळेच शिवसेनेच्या जीवावर निवडणूका जिंकण्यासाठी दिल्लीपासून मुंबईपर्यंतचे भाजपा नेते शिवसेनेला सोबत घेण्यासाठी प्रयत्नात होते. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारही मातोश्रीवर जाऊन युतीचा प्रस्ताव ठेवण्यासाठी गुडघ्याला बाशींग बांधून बसले आहेत. परंतु उध्दव ठाकरेंनी त्यांना वेळच न दिल्यामुळे त्यांचा हिरमोड झाला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा सुध्दा शिवसेनेने सोबत राहावे म्हणून उतावीळ झाले आहेत. परंतु शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे काही भीक घालण्याच्या तयारी नाही हे पुन्हा आज औरंगाबादेतील त्यांच्या विधानावरुन स्पष्ट झाले आहे. परंतु राजकारणात कधी कुणी कायमचा शत्रु नसतो असं म्हटलं जात आणि ते तितक खरही आहे. कारण याच शिवसेना, भाजपाने मागच्या विधानसभा स्वबळावर लढून शेवटी सत्तेचा मलिदा लाटण्यासाठी युती केलेलीच आहे. सध्या शिवसेनेची पंचाईत झालेली आहे. एकतर स्वबळावर लढायचे किंवा भाजपच्या आश्रयाने उभे राहायचे. याआधी सेनेने स्वबळावर निवडणूक लढविली आहे, तीत तिला आपले उमेदवार भाजपच्या उमेदवाराएवढ्या संख्येने विजयी करणे जमले नाही. भाजपला सेनेची साथ हवी असतानाही, केवळ पवारांच्या शब्दावर विसंबून राहून त्या पक्षाने राज्यात आपले सरकार आणले. पवारांची ती साथ सेनेला खाली पहायला लावणारी आणि, तुम्ही नाही तर आम्ही, आपला नाही तर बाहेरचा पाठिंबा असे करून सेनेला नमविणारी होती. भाजपने सेनेची ताकद व तिच्या डरकाळीचा प्रभाव तेव्हा जोखला आहे. नंतरच्या काळात देतील ते पदे घेऊन सेना फडणवीसांसोबत गेली. गेल्या तीन-चार वर्षात भाजपने सेनेला आणखी दुबळे केले आहे. जास्तीची मंत्रिपदे नाहीत, महत्त्वाची खाती नाहीत आणि केंद्रातही फारशी वट नाही. ही स्थिती जेवढी दयनीय तेवढीच आपल्या अस्तित्वाची दखल ठेवण्यासाठी अधूनमधून कुरघोडी करायला लावण्याइतपतच महत्त्वाची उरली असते. पूर्वी सेनेची समजूत घालायला महाजन जायचे, कधी मुंडे मातोश्रीवर हजेरी लावायचे, आता मुनगंटीवार जातात आणि सेनेची ‘समजूत’ घालून परत येतात. दोन दिवसापूर्वीच उध्दव ठाकरेंनी त्यांना भेटीसाठी वेळ दिला नव्हता. पुन्हा मुनगंटीवार मातोश्रीला जाऊन उध्दव ठाकरे समोर लोटांगण घालतीलही. शेवटी उध्दव ठाकरे हे आपल्या शब्दावर किती प्रमाणात कायम राहतात हे लवकरच समजून येईल. मात्र युती केली तर ती त्यांची राजकीय आत्महत्या असेल असे त्यांच्याच पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचेही म्हणणे आहे. मात्र पुढे काय होईल तो पर्यंत वाट बघावी लागेल.

वैदेही तामण
मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments