Friday, March 29, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखदेवेंद्र फडणवीस पुन्हा...पुन्हा आपटले...!

देवेंद्र फडणवीस पुन्हा…पुन्हा आपटले…!

devendra fadnavis mi punha yein
devendra fadnavis mi punha yein

सत्तेची हाव वाईटचं असते. सत्तापिपासू झालेल्या मंडळींना खुर्ची शिवाय करमत नाही. त्यामुळेच मी पुन्हा येईन…, मी पुन्हा येईनची स्वप्न बघणारे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेते सध्या सत्तेसाठी हपापले आहेत. महाविकास आघाडी सरकार विरोधात कोणत्याही विषयावर टीका करुन संधी साधण्याचा प्रयत्न करत असतात. महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. परंतु त्या वर्षभरात भाजपच्या डझनभर नेत्यांनी ठाकरे सरकार पडणार, यासाठी वेगवेगळ्या तारखा सांगितल्या. ठाकरे सरकार कधी पडणार याचा मुहूर्त भाजपचे नेते सांगत होते. आजही भाजपच्या मंडळींना वाटत आहे की आपण पुन्हा पहाटे शपथ घेऊन सत्तेत येऊ. ठाकरे सरकारकडे पूर्ण बहुमत असून फडणवीसांचे सत्तेचे स्वप्न पहाणे म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’; अशी गत त्यांची झाली आहे.

फडणवीसांनी अजित पवारांसोबत घेतलेली पहाटेची शपथ त्यानंतर मोडलेला संसार पुन्हा जुडेल याची वाट फडणवीस नेहमी बघत असतात. दर आठ दहा दिवसांत भाजपचा एक तरी मोठा नेता महाआघाडी सरकार कोसळेल अशी विधाने करत असतो. त्यानंतर सत्ताधा-यांकडून त्याची खिल्ली उडवली जाते. महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही सुरळीत सुरु आहे याची आठवण विरोधकांना करुन देतात. राज्यपाल भवन हा भाजपचा अड्डा बनला असून असा आरोप सत्ताधा-यांकडून केला जात आहे.

विरोधी पक्ष हा मजबूत असला पाहिजे त्यांची कोणतीही तक्रार, मागणी असली तरी त्यांनी ती मुख्यमंत्र्यांकडे केली पाहिजे. परंतु राज्यातील विरोधक हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे न जाता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे तक्रार करत असतात. कोश्यारी हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री आहेत. त्यामुळे भाजपची मंडळी आपली सर्व कौफियत त्यांच्याकडे मांडत असतात. वारंवार कोणत्याही विषयी सरकार विरोधात ते तक्रारी करत असतात. राज्यात कायदा सुव्यवस्थेचे कसे धिंडोळे उडवले जात आहे असा आरोप करतात. शेवटी राज्याचा कारभार चालवताना अनेक अडचणी असतात. हे फडणवीसांना माहित आहे.

वाचा: धक्कादायक: अजित पवारांच्या बंगल्यात नऊ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह सापडले

कोरोनाकाळात भाजपच्या मंडळींनी हे उघडा ते उघडा यासाठी आंदोलने केली. रस्त्यावर आले. सरकारच्या विरोधात भूमिका घेतली. त्यामुळे नाईलाजास्तव सरकारला कोरोना काळात धार्मिक स्थळांसह इतर ठिकाणी सर्व नियम शिथील करावे लागले. परंतु आजच्या घडीला कोरोनाने डोकेवर काढले आहे. हीच भाजपची मंडळी महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने ठाकरे सरकारला दोष देत आहेत.

बुधावारी भाजपाच्या मंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतली. याच भेटीवरुन कॉमेडीयन कुणाल कामराने फडणवीसांनावर निशाणा साधला आहे. फडणवीस रोज पहाटे चार वाजता उठून तयार होऊन राज्यपालांना फोन करतात असा टोला कामराने लगावला आहे. कुणाल कामराने एक ट्विट केलं असून त्यामध्ये फडणवीसांचा उल्लेख केलाय. “जर तुम्हाला आपल्या आयुष्यात अनेक गोष्टींमध्ये अपयश येत आहे असं वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की देवेंद्र फडणवीस रोज पहाटे चार वाजता उठून तयार होतात आणि राज्यपालांना फोन करुन विचारतात, मी पुन्हा येऊ का?”, असं ट्विट कामराने केलं आहे. यामध्ये त्याने स्मायलीजचाही वापर केलाय. फडणवीस आणि भाजपच्या मंडळींनी सत्तेची स्वप्ने पाहून जो काही खेळ चालवला आहे त्यावरून मनोरंजन होतं आहे.

वाचा: राहुल गांधींची RSS वर बोचरी टीका,म्हणाले यापुढे ‘परिवार’ उल्लेख करणार नाही…

कुणाल कामराने बुधवारी सकाळी केलेल्या या ट्विटला २९०० हून अधिक जणांनी रिट्विट केलं आहे. महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या संघर्षाच्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापनेचा दावा करत भल्या पहाटे राजभवानावर जाऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. अवघ्या काही दिवसांनंतर राजकीय घडामोडींमुळे अजित पवारांनी आपला पाठिंबा काढून घेतला आणि फडणवीसांनी राजीनामा दिला. यामुळे सर्वात कमी कालावधीसाठी राज्याचा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला होता. पहाटेच्या या शपथविधीवरुन बराच राजकीय गोंधळ निर्माण झालेला. त्याचाच संदर्भ देत कुणाल कामराने फडणवीसांवर आता निशाणा साधलाय.

राज्यात कायदा सुव्यस्था टिकवणे जेवढी सत्ताधा-यांची जबाबदारी आहे तेवढीच जबाबदारी विरोधकांचीही आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सर्व काही आलबेल आहे असंही नाही. ठाकरे सरकारचे सरकारचे एक वर्ष कोरोना काळात गेले. सध्याही राज्यातील परिस्थिती कोरोनामुळे रुळावर आली नाही. त्यामुळे राज्याच्या विकासामध्ये बरेच अडथळे निर्माण झाले आहेत.परंतु महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या संकटातही बरेच चांगलेच निर्णय घेतले आहेत. महाविकास आघाडी सरकारकडे पूर्ण बहुमत असल्यामुळे फडणवीसांसह भाजपच्या मंडळींनी कितीही आदळआपट केली तरी हे सरकार पडणार नाही. त्यामुळे मी पुन्हा येईन.. मी पुन्हा येईन.. ही सत्तेची स्वप्न फडणवीस बघत राहतील आणि महाविकास आघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेलं.

Dr. Vaidehi
Dr. Vaidehihttp://www.vaidehisachin.com
न्यूजमेकर्स ब्रॉडकास्टींग कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या आठ वर्षापासून समूह संचालक आहेत. इंग्रजी दैनिक आफ्टरनून व्हॉईस, मराठी दैनिक मुंबई माणूस, मुंबई माणूस मराठी वेब पोर्टल च्या राजकीय पत्रकार कार्यरत आहेत. संशोधक पत्रकार, हॅकर्स म्हणून उत्तमप्रकारे काम केले आहेत. त्यांना विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments