Friday, April 26, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखसैनिकांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह का?

सैनिकांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह का?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी लष्काराच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे विधान करुन जो शहाणपणा केला त्याचा निषेध कोणत्याही शब्दात केला तर तो कमीच आहे. भारतीय लष्कराला तयार व्हायला सहा-सात महिने लागतात पण संघ स्वयंसेवक तीन दिवसात सज्ज होतात असे वक्तव्य करून सरसंघचालक भागवत यांनी भारतीय लष्कराच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून सैन्याचा अवमान केला आहे. परंतु तो अधिकार संघाला कुणी दिला. देशामध्ये लष्कर असतांना अशी बोलण्याची भागवतांमध्ये हिंमत आलीच कुठून? हा खरा प्रश्न आहे. भागवातांच्या विधानावरुन सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहेत. भागवातंनी  सैन्यदलाची व देशाची माफी मागावी अशीही मागणी जोरधरु लागली आहे. ज्यावेळी भारतीय जवान आपल्या प्राणाची बाजी लावून जम्मू काश्मीरमधील सुंजवान येथे दहशतवाद्यांशी लढत होते. त्यावेळी भागवत यांनी लष्कराच्या अगोदर संघ स्वयंसेवक तयार होतील असे वक्तव्य केले. त्यांचे वक्तव्य लष्कराचे मानसिक खच्चीकरण व अवमान करणारे आहे. स्वातंत्र्य चळवळीत ब्रिटिशांविरोधीत लढण्याच्या वेळी याच संघाने माफी नामे लिहून दिले होते. ब्रिटिशांशी हातमिळवणी करून स्वातंत्र्य सैनिकांना पकडून देण्यासाठी मदत करणारे व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करणारे आज देशाच्या सैनिकांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून स्वत:च्या बेगड्या देशभक्तीची ग्वाही देत आहेत. हेच विधान जर इतर पक्षाच्या कुणी नेत्याने केले असते तर याच ढोंगी मंडळींनी व बेगड्या प्रेमवाल्यांनी त्याला देशद्रोहीचा सर्टीफिकेट देऊन तुरुंगात टाकण्याची भाषा केली असती. तसेच पाकिस्तानला पाठवा अशी ओरड केली असती. एका शिराच्या बदल्यात दहा शिर आणण्याची भाषा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वांत कमजोर पंतप्रधान म्हणून सिध्द झाले.मोदी यांच्याच कार्यकाळात गेल्या ४५ महिण्यात पाकिस्तानने २४६ वेळा हल्ले केले. यामध्ये २८० जवान शहीद झाले. २ हजार ५५५ वेळा फायरिंग केले. तर दुसरीकडे एनडीएचे काही मंत्री पाकिस्तानवर हल्ला करा म्हणून विधान करुन मोकळे होतात. जे जवान सिमेवर लढतात आपले रक्षण करतात त्यांच्या जीवाची सरकारला कोणतीही चिंता नाही. फक्त जवान शहीद झाले की शासकीय इतमामात अंतिम संस्कार करायचे मदत जाहीर करायचे झाले यांचे काम. परंतु ज्या कुटुंबातील व्यक्त निघून जातो. त्याच्या कुटुंबियांची काय अवस्था असते याची थोडीही जाण या बेगडी प्रेमवाल्या मंडळींना नाही.फक्त वादग्रस्त विधाने करुन आणि पोकळ धमक्या देऊन ही मंडळी वाह वाह मिळवते. मात्र प्रत्यक्ष जी मंडळी जिवाची बाजी लावून लढा देते त्याची यांना कोणतीही काळजी नाही. काही दिवसांपूर्वीच नौदलाच्या वसाहतीसाठी दक्षिण मुंबईत एक इंचही जागा दिली जाणार नाही, असे वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले होते. नौदल अधिकाऱ्यांचे काम पाकिस्तानच्या सीमेवर पहारा देण्याचे असताना या अधिकाऱ्यांना दक्षिण मुंबईतील ‘पॉश’ भागात का राहायचे आहे?, असा सवालही गडकरी यांनी केला. होता. परंतु त्या वेळी गडकरींच्या विधानाचा विरोधकांनी समाचार घेतला होता. कारण नौदलचे अधिकारीही पाकिस्तानच्या सीमेवर आपल्यासाठीच कर्तव्य बजावतात. त्यांना जागा न देण्याचे विधानही संतापजनकच होते. खरतर ज्यावेळी सत्तेची हवा डोक्यात शिरते त्यावेळी उलट सुलट व संतापजनक विधाने बाहेर पडतात. मात्र हे देशासाठी धोक्याचे असून नेत्यांनी आपल्या तोंडाला आवर घातली पाहिजे. अन्यथा देशात सैनिकांचे मनोबलाचे सत्ताधाऱ्यांकडून खच्चीकरण होत असेल आणि अपमान केला जात असेल तर तो लोकशाहीसाठी धोकादायक आहेत.

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments