सनातन प्रणाली – एक विवेचन

वास्तविक पहाता 'सनातन' धर्म ही एक प्रणाली आहे जी अनेक पंथांना, दर्शनांना,चितनांना पूरक आणि पोषक वातावरण प्रदान करते. म्हणूनच 'धर्म' हा शब्द या प्रणालीस अगदी चपखल बसतो.

- Advertisement -

Sanatan Pranaliकुठलाही पंथ म्हटला की त्याचे एक पुस्तक, त्याला अभिप्रेत एक ईश्वर आणि त्या पंथाची स्थापना करणारा एखादा ‘युगपुरूष’ असलाच पाहिजे अशी आजची धारणा झाली आहे. ही धारणा काही अंशी जरी बरोबर मानली तरी ‘सनातन’ धर्माच्या बाबतीत हा निकष अगदी तोंडावर पडतो! वास्तविक पहाता ‘सनातन’ धर्म ही एक प्रणाली आहे जी अनेक पंथांना, दर्शनांना,चितनांना पूरक आणि पोषक वातावरण प्रदान करते. म्हणूनच ‘धर्म’ हा शब्द या प्रणालीस अगदी चपखल बसतो. ‘धर्म’ या शब्दाची व्युत्पत्ती पहात असताना मूळ धातु ‘धृ’ आहे हे लक्षात येईल. ‘धृ’ चा धारण करणे असा होतो.
यो धारयति इति धर्मः ।
अशी धर्माची व्याख्या केली जाते. याच कारणास्तव, ‘जो धारण करतो (धरून ठेवतो) तो धर्म’ अशी सर्वसमावेशक व्याख्या इतर पंथांपासून वेगळेपण तर दर्शवतेच पण इतर पंथांना, चिंतनांना बरोबर घेऊन जाण्याचा एकात्मिक उद्देश देखील प्रतिपादित करते.

आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् ।
सर्वदेवनमस्कारः केशवं प्रतिगच्छति ॥
असे सर्वसमावेशक चिंतन जी प्रणाली घेऊन चालते तोच खरा धर्म.
जेव्हा खोडसाळपणे अथवा अज्ञानवश, अश्या प्रणालीचा इतर ‘संकुचित’ (अनादर करण्याचा मानस नाही!) पंथांशी तुलना केली जाते तेव्हा हिंदू धर्माचा ‘धर्मग्रंथ’ शोधण्याची कपोलकल्पित चढाओढ सुरू होते. मूळ मुद्दा हा की जी प्रणाली वेगवेगळ्या, भिन्न चिंतनांना एकत्र घेऊन मार्गक्रमण करू इच्छिते, ती आपली भिस्त एका विवक्षित पुस्तकावर ठेऊच शकणार नाही. कारण तसे केल्याने वेगवेगळ्या चिंतनांमधला विरोधाभास प्रामुख्याने प्रकट होऊन मूळ उद्देशालाच मोठी बाधा उत्पन्न होईल.

भारतामध्ये उगम पावलेल्या सर्वच दर्शनांनी, चिंतनांनी आणि पंथांनी या हिंदू प्रणालीमध्ये (धर्मामध्ये) स्वतःचा अन्तर्भाव करून घ्यायचा नेहमीच प्रयत्न केला आहे असे लक्षात येईल. पूर्णपणे विरोधी विचारांवर आधारित तत्वज्ञाने या प्रणालीमध्ये संलग्न पद्धतीने नांदत असल्याचे आपणास दिसेल. याचे प्रमुख कारण म्हणजे ‘माझाच मार्ग योग्य; इतर अयोग्य’ या विचाराचे सार्वत्रिक दमन! असे दमन झाल्यामुळे दुस-याचा मुद्दा जरी अमान्य असला तरी तो सर्वथा त्याज्य नाही हे मान्य करण्याची प्रगल्भता. ही प्रगल्भता येण्याचे कारण म्हणजे या भूप्रदेशामध्ये वास करणा-या समाजाची हजारो वर्षांची स्मृती, त्या समाजाचा एकत्रित अनुभव आणि त्यातून उत्पन्न झालेली सांस्कृतिक जडण-घडण! सांगण्याचे तात्पर्य इतकेच की हिंदू धर्माला या प्राचीन संस्कृतीपासून वेगळे करून बघताच येणार नाही; कारण तसे केल्यास वर उदृत केलेल्या प्रगल्भतेचाच कुठेतरी नाश होईल. या प्रगल्भतेमुळेच अनेक आराध्य, अनेक देव, अनेक ईश्वर आणि काही वेळेस अगदी ईश्वर न मानणा-या चिंतनांचा अन्तर्भाव सनातन धर्मामध्ये आपल्याला दिसून येईल. आपल्या चिंतनाच्या देखील मर्यादा असू शकतात आणि आहेत हे मान्य करण्याचे ‘औदार्य’ याच प्रगल्भतेमुळे निर्माण होते यात शंका नसावी. असे मान्य केल्यामुळे नविन काहीतरी शोधण्याचा सततचा प्रयत्न या दर्शनांमध्ये दिसतो. म्हणजेच मानण्याच्या ऐवजी शोधण्यावर दिलेला भर सद्सद्विवेकबुध्दीला नेहमीच साद घालत रहातो.

- Advertisement -

परंतु, काही पंथांमध्ये ऐहिक स्वार्थाकरिता (आर्थिक आणि राजकीय) याच प्रगल्भतेला तिलांजली दिलेली पहावयास मिळते. ईश्वर आणि मनुष्यामध्ये गुलाम आणि मालकाचं किंवा मेंढरं आणि मेंढपाळाचं नातं पहावयास मिळतं. ईश्वराचा एकाधिकार स्थापन करण्याची ‘मानवीय’ चढाओढ दिसून येते. ‘My way or the highway’ ची मानसिकता उफाळून आलेली दिसते. अर्थातच, या सर्व गोष्टी एकेश्वरवादी पंथांमध्ये प्रामुख्याने दिसून येतात. अशी मते ‘मानणारा’ मानव समूह हिंदू धर्माला अभिप्रेत प्रगल्भ, उदार आणि सर्वसमावेशक प्रणालीचा भाग होऊ शकत नाही.

फ्रेन्च क्रान्तिनंतर युरोपामध्ये निर्माण झालेल्या secularism या संकल्पनेने राजकिय व्यवस्था आणि चर्च यांच्यामधील स्वारस्य संघर्षाला (conflict of interest) ला लगाम घातला. त्यामुळे ख्रिश्चन पंथातील ‘आडत्यांच्या’ आर्थिक आणि राजकीय आकांक्षांना खीळ बसली. या आकांक्षा काही अंशी कमी झाल्यामुळे ख्रिश्चन पंथाचे अधिपत्यवादी अक्राळविक्राळ स्वरूप थोडेसे मवाळ झाले. संपुष्टात आलेले नाही आणि तशी अपेक्षा करून कोणी दीवास्वप्न पहात असेल तर त्याला शतशः नमन! इकडे, इस्लाममध्ये असे काही होताना दिसत नाही. आर्थिक आणि राजकीय शक्तीचा उपयोग ‘आस्थासंघर्ष’ पेटवण्यासाठी बेमालूमपणे करण्यात येत आहे आणि त्यातून पुन्हा आर्थिक आणि राजकीय स्वार्थ साधण्याचा दोन कलमी कार्यक्रम इस्लाममध्ये प्रकर्षाने दिसून येत आहे. इस्लामची धाटणी अशाप्रकारची आहे की त्यामध्ये बदल करणे अशक्यप्राय आहे. इस्लाम न मानणारे (काफर), इस्लाम सोडून दिलेले (मूरतद) आणि इस्लाम मानण्याचे ढोंग करणारे (मुनाफिक) निर्माण होतील पण इस्लाम बदलणे अशक्य आहे ! असा ‘बदल’ घडेल हे स्वप्न पहाणारे, इतर मुसलमानांसारखे न येणा-या ‘आखिरत’ पर्यंत ताटकळत बसतील यात शंका नाही.

भारतीय पंथांमध्ये सुध्दा ‘माझाच मार्ग श्रेयस्कर’ ही संकल्पना कालोघामध्ये उफाळून आलेली उदाहरणे आहेत. परन्तु हे पंथ एका मोठ्या हिंदू प्रणालीचा भाग असल्यामुळे या ‘अस्थायी’ विमर्षाचे शमन,दमन आणि परिमार्जन नेहमीच होत आले आहे. यालाच ‘शास्त्रार्थ’ ही उचित संज्ञा दिली गेलेली आहे. या शास्त्रार्थापासून राजकीय स्वारस्य असणा-या व्यक्तींना आणि मानसिकतांना दूर ठेवण्याचे काम देखील याच प्रणालीने नेहमी केलेले आहे. याच कारणास्तव ‘सनातन’ हा शब्द मोठ्या आत्मविश्वासाने आम्ही या धर्मासाठी आणि संस्कृतीसाठी वापरतो.

जे समाविष्ट होऊ इच्छितात त्यांच्याकरिता सर्वसमावेशकता आणि जे होऊ इच्छित नाहीत त्यांचे शमन, दमन आणि परिमार्जन या दोन साधनप्रणालींचा सारासारविवेकाने आणि प्रगल्भबुध्दीने केलेला समर्थ उपयोग हेच या संस्कृतीच्या हजारो वर्षांच्या अस्तित्वाचे गमक आहे!

आस्थाऽहंकारस्य शमनेन दमनेन परिमार्जनेन वा ।
सर्वसमावेशकी इयं संरचना वसुधायां विराजते ॥

© श्री. काफर इमानदार

 

Web Title: Sanatan Pranali – Ek Vivechan

- Advertisement -