Saturday, April 20, 2024
Homeमुख्य बातम्यागल्लीबोळात दडलेले शेकडो ‘व्हाईट कॉलर विकास दुबे’चं काय करणार?

गल्लीबोळात दडलेले शेकडो ‘व्हाईट कॉलर विकास दुबे’चं काय करणार?

Vikas Dubey, Encounter, Kanpur Encounter, Dubey, Ujjain, Madhya Pradesh, Uttar Pradeshकानपूर उत्तरप्रदेशचा कुख्यात गुंड विकास दुबे अखेर गजाआड झाला. 12 तासात त्याचा एन्काऊंटरसुद्धा झाला. त्याआधी त्याचे 6 साथीदार असेच ‘कुत्ते की मौत मर गये।’ कारण त्याने 8 पोलिसांना शहीद केले होते. कु्रर विकास दुबे मध्यप्रदेशमध्ये पकडला गेला तेव्हा कबुली देताना म्हणाला, “मी पोलिसांना जाळणार होतो. पाच पोलिसांचे मृतदेह रचून पेट्रोलही ओतले होते.” याआधी त्याच्यावर एका राज्यमंत्र्याच्या हत्येचाही गुन्हा दाखल होता. दुबेने एकूण 60 प्रकारचे गंभीर गुन्हे केलेत. स. पा., बसपा, भाजपा व काँग्रेस पक्षाच्या बड्या नेत्यांशी त्याचे घनिष्ठ संबंध होते. तसे फोटोही प्रकाशित झालेत.

एखाद्या चित्रपटाच्या कहाणीला लाजवेल असा हा घटनाक्रम आहे. ज्यावेळी मायावती युपीच्या मुख्यमंत्री होत्या, त्यावेळी पाच वर्षात दीड लाख एन्काऊंटर केल्याचं ऑफीशिअल रेकॉर्ड युपीत आहे.

हत्या-बलात्कार करणार्‍या आरोपींचे एन्काऊंटर होत असेल तर कुणाचाच विरोध असता कामा नये. ‘टीट फॉर टॅट’ चा कायदा असायलाच हवा. दुसरीकडे प्रश्न पडतो ‘तारीख पे तारीख’ देणार्‍या न्यायव्यवस्थेवर पोलीस व समाजव्यवस्थेचा विश्वास उरलेला नाही हेच स्पष्ट होते.

दीड लाख एन्काऊंटर होणारा प्रदेश भारताचा हिस्सा असावा? ज्या देशात ‘अहिंसा’ हा एकच शब्द घेऊन मोहनदास करमचंद गांधी 50 वर्षे लढले. देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्या देशात दहशतवाद्यांपेक्षा गँगस्टर वाढावेत ही चिंतेची बाब आहे.

स्वातंत्र्यानंतर 72 वर्षे आपण कशाशी लढतोय. दहशतवाद व दहशतवादी. पाकिस्तान व काही काळ श्रीलंका (एलटीटीई). आज देश आतून किती खोकला झालाय? गँगस्टरचे कारखाने व त्या कारखान्यांचे मालक कोण?

नेता होण्याचं पहिलं क्वॉलिफिकेशन कोणतं? या प्रश्नाच्या मुळातच लाखो ‘व्हाईट कॉलर विकास दुबे’दडलेत. ग्रामपंचायतीचा सरपंचसुद्धा अलिकडे 10-20 गुंड घेऊन पंचायत समितीच्या सभापतीला भेटतो. चार हाफ मर्डर, भूमाफिया, चार-पाच मर्डर करणारे कर्तबगार युवा नेते घेऊन जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपल्या लाडक्या आमदाराची करमणूक करतो. मागेल तेवढे पैसे, प्राईम ठिकाणचे भुखंड, जमिनीचे नकाशे, टाऊनशीपची पार्टनरशीप देणारे राज्य मंत्रीमंडळात मंत्री होणार. श्रेष्ठी त्यांच्यावर खुश असणार.

पक्ष चालविणारे प्रादेशिक नेते केंद्रात मोठे नेते होण्यासाठी साम-दाम-दंड-भेद यांची निर्मिती करणार. म्हणजेच गाव पातळीपासून राज्य पातळीपर्यंत सगळे काळेच धंदेवाले, गँगस्टर, त्यांचे पाठीराखे घेऊन आपले केंद्रीय वजन वाढविणार असाल तर हे वारुळातले विकास दुबे कमी होणार कसे?

मतितार्थ एवढाच आहे की, जो पैसा गोळा करून देणार, प्रसंगी खून-दरोडे टाकणार. एवढंच कशाला नेत्याला ‘रेस्टहाऊस’ची करमणूक पोहोचविणार. हा अपराध नाही? सहमतीने केला तो संभोग. जबरदस्तीने केला तो बलात्कार. या देशात रोज सहमतीचे शेकडो बलात्कार होतात. त्याचे मुळ विकास दुबेच असतात. कारण अशा रोपट्यांना खतपाणी ‘व्हाईट कॉलर विकास दुबे’च घालत असतात.

तुम्ही, आम्ही कुणाला सहकार महर्षी, अन्नदाते, गरीबांचे कैवारी, कार्यसम्राट, कलाप्रेमी, साहित्यप्रेमी असं उगाचंच म्हणतो. या प्रत्येक ‘व्हाईट कॉलर विकास दुबे’चा जन्म हा गटारात वळवळणार्‍या किड्यापेक्षा वेगळा झालेला नाही.

गंगा पवित्र आहे. देशाची सेवा करणारे लाखो पवित्र आहेत. परंतु खरे पवित्र चेहरे पुढे येतच नाही. कारण गंगोत्रीत लघुशंका करणारे हजारो आहेत. त्यांच्यामागे गँगस्टर आहेत, खर्च करण्यासाठी उद्योगपती आहेत. अशा वेळी विकास दुबे कायमचे संपतीलच कसे? चार दिवस दुबेंच्या एन्काउंटरची चर्चा होईल. ‘व्हाईट कॉलर दुबे’ पुन्हा कामाला जुंपतील.

मेरा भारत महान!

– मधुकर मुळूक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments