Wednesday, April 17, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखबांगड्या विकून शिकविणाऱ्या आईला 'कलेक्टर' ऑफिसमध्ये नेतो तेव्हा...

बांगड्या विकून शिकविणाऱ्या आईला ‘कलेक्टर’ ऑफिसमध्ये नेतो तेव्हा…

रांची: झारखंड राज्यातील कोडरमा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी आपल्या आईला जिल्हाधिकारी कार्यालयात आणलं असून ते स्वत: खुर्चीवर बसले आहेत. तर, कलेक्टर मुलाच्या खांद्यावर आईने आपला मायेचा हात ठेवला आहे. या फोटोतील कलेक्टर मुलाचे डोळे आणि कलेक्टर मुलाचं ऑफिस पाहून भारावलेल्या आईच्या चेहऱ्यावरील भावनाच सर्वकाही सांगत आहेत.

उपायुक्तसह जिल्हा दंण्डाधिकारी, कोडरमा नावाचा फलक, चकाकणारं स्वच्छ ऑफिस, ऑफिसमधील टेबलावर देशाचा तिरंगा ध्वज अन् संविधानांचं बोधचिन्ह, त्या बोधचिन्हाच्या बाजुला असलेली सुवर्णअक्षरातील नेमप्लेट रमेश घोलप,भारतीय प्रशाकीय सेवा आणि ऑफिसमधील खुर्चीवर बसलेले महाराष्ट्रपुत्र जिल्हाधिकारी रमेश घोलप अन् बाजुलाच त्यांच्या मातोश्री.

तस्वीर बोलती है… असे आपण ऐकलं असेल. पण ही तस्वीर खूप काही बोलून जाते. तर, या फोटोसोबतच रमेश घोलप यांनी ”तिला काय वाटत असेल?” या टॅगलाईनने एक लेख लिहिला आहे. त्यामध्ये आपल्या अडाणी आईने कशाप्रकारे जिल्हाधिकारी मुलगा घडवला, याच वर्णन घोलप यांनी केलं आहे. तसेच, नवरा दारुच्या आहारी गेलेला, पण या माऊलीनं दारोदारी बांगड्या विकून आपल्या दोन्ही मुलांचं डीएड शिक्षण पूर्ण केलं. मुलांना शिक्षक बनविण्याचं स्वप्न बनवणाऱ्या आईनं मुलाची शिक्षणातील गोडी लक्षात आपल्या रमूला थेट जिल्हाधिकारीचं बनवलं.

महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे मूळ निवासी असलेल्या जिल्हाधिकारी रमेश घोलप यांनी लिहिलेली ही कथा कित्येकांचे डोळे पाणावते आहे. त्यामुळेच, अनेकांनी हा फोटो शेअर करुन त्याच्या कार्याला सॅल्युट केला आहे. तर, आईपुढे नतमस्तक झाल्याचं कमेंटवरुन पाहायला मिळतं. रमेश घोलप यांनी 2012 मध्ये आयएएसची परीक्षा क्रॅक केली होती. ग्रामीण भागातून पुढे आलेल्या या आयएएस अधिकाऱ्यापासून अनेकांनी प्रेरणा घेतली. त्यानंतर, कित्येक अधिकारी सोलापूर जिल्ह्यात घडले आहेत. तर, माझ्या गावाला अधिकाऱ्यांचं गाव बनवायचं हेच माझं स्वप्न असल्याचं रमेश घोलप आपल्या भाषणात नेहमी सांगतात. तसेच, आपलं आत्मचरित्र ‘इथे थांबणे नाही’ यातूनही त्यांनी मी यशाच्या मार्गावर चालत निघालोय, तिथे मला थांबायचं नाही, असेही ते वारंवार सांगतात. दरम्यान, रमेश घोलप यांच्या संवेदनशील कार्याची दखल झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनीही घेतली आहे. तसेच, त्यांच्या कार्याचे कौतुकही दास यांनी अनेकदा केलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments