Saturday, April 20, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखकुठ नेऊन ठेवली पत्रकारिता? (भाग दोन)

कुठ नेऊन ठेवली पत्रकारिता? (भाग दोन)

दिल्ली पासून गल्ली पर्यंत हजारो छोटे-छोटे झोला छाप वृत्तपत्र चालवली जातात. ते लोकांना ब्लॅकमेल करून, खोटं बोलून, बदनामी करून घाबरवतात आणि स्वतःची कामे काढून घेतात, त्या लोकांच्या तोंडावर पैसे टाकून लोक तशीच मोकळी होतात जशी कुत्र्याला भाकरीचा तुकडा किंवा भिकारीला भीक देतात आणि आपल्या इशाऱ्यावर नाचवतात. आजच्या पत्रकारितेचे स्वरूपच पूर्णपणे बदलले आहे. विविध रंगांमुळे ते वृत्तपत्र रंगपंचमी इतके रंगवता येते. आधुनिक छायाचित्रणाच्या सुविधांमुळे ते आकर्षितही दिसतात. ते पण या सगळ्या खटाटोपात वृत्तपत्राच्या लिखानाचा दर्जा ढासळला. तसेच वृत्तपत्राचा दर्जाही घसरत चाललेला आहे. आजच्या वृत्तपत्रांकडे नजर टाकली तर प्रसिद्ध होणा-या सगळ्या वृत्तपत्रांचा अभ्यास करणा-यांना त्या वृत्तपत्रांची खोली दोन- तीन टक्के आहे. वरवरच्या बातम्या ९० टक्के आहेत. स्वाभीमान गहाण ठेवून केलेली पत्रकारिता होत आहे. २० हजार महिन्याला कमावणारा पत्रकार आज महागड्या गाडीतून फिरतो, परदेशात भ्रमण करतो आणि बंगले बांधतो. विचार करा, एवढी संपत्ती ह्यांच्या कडून येते कशी? कारण हे लोकं चाटुकार झालेत, ह्यांच्यातील पत्रकार केंव्हाच आत्मा सोडून निघून गेलेला आहे. मराठी पत्रकारितेची ही महान परंपरा बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, आचार्य अत्रे, नीलकंठ खाडिलकर, यांच्यापासून सुरू झालेली परंपरा आहे. ती परंपरा एका कारणासाठी पत्रकारिता समर्पित करायची अशी झपाटलेली पत्रकारिता आहे. त्या काळातली छपाईची अपुरी साधने, त्या काळातल्या वृत्तपत्रांच्या संकल्पना, छपाईच्या क्षेत्रात आज जी उत्तुंग झेप घेतली गेली आहे, तशी कोणतीही व्यवस्था नसताना आणि दोन पैसे फायदा मिळवून ‘या व्यवसायाचा धंदा न करता केलेली पत्रकारिता’ हे मराठी पत्रकारितेचे खरे कूळ आहे. बाबासाहेबांचा ‘मूकनायक’ किंवा ‘बहिष्कृत भारत’, टिळकांचा ‘केसरी’, मराठी भाषेत नसला तरी ‘हरिजन’ आणि ‘यंग इंडिया’ ही महात्माजींची वृत्तपत्रे एका धोरणाभोवतीच सर्वस्व पणालालावून काम करत होती. मराठी पत्रकारितेचे हे प्रभावी कूळ आहे. त्यात रामभाऊ मंडलिक (कुलाबा समाचार), भाऊसाहेब माडखोलकर (तरुण भारत), रा. ग. जाधव (पुढारी),औरंगाबादचे अनंत भालेराव (मराठवाडा), सोलापूरचे रंगा वैद्य (संचार), बाबूराव जक्कल (सोलापूर समाचार), अमरावतीचे बाळासाहेब मराठे (हिंदुस्थान), दादासाहेब पोतनीस (गावकरी), वालचंद कोठारी (पुणे), ब्रिजलाल पाटील (जळगाव), गोविंद तळवलकर, माधव गडकरी अशी नावे जेव्हा सहजपणे समोर येतात तेव्हा जाणवते की, मराठी पत्रकारितेत एक दरारा होता, धाक होता, चारित्र्य होते. आज मराठी पत्रकारितेच्या ‘दर्पणा’त पाहताना आम्ही पत्रकारांनी आम्हालाच प्रश्न विचारला पाहिजे की, आमचे जे मूळ कूळ आहे, त्या कुळाचा धर्म आम्ही किती पाळतो, किती मानतो, आमची वाटचाल त्या कुळाला शोभेल अशी होत आहे का? काही दिवसापूर्वी मी आजच्या पत्रकारितेबद्दल एक लेख वाचला होता, त्यात एक पत्रकार खुप सुंदर पाने सजवतो. परंतु त्याचा फायदा काय? एकूण महाराष्ट्राच्या पत्रकारितेचा अभ्यास केला तर इथून प्रसिद्ध होणारी सगळी वृत्तपत्रे त्यात मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतर सर्व वृत्तपत्रे धरून सुद्धा सर्व वृत्तपत्रांच्या छपाईची संख्या किती कोटी असेल? एक कोटीच्या आसपास तरी असेल का? महाराष्ट्राची लोकसंख्या किती? तर जवळपास १० कोटी. एकूण वृत्तपत्रांचा खप किती आहे? प्रत्येक वृत्तपत्र २-४ लोक वाचतात, असे धरले तरी महाराष्ट्रात वृत्तपत्र वाचणा-यांची संख्या जास्तीत जास्त ५ ते ६ कोटी आहे, असे गृहीत धरूया. तरीसुद्धा वाडी-तांडय़ावरचे आदिवासी, शेतमजूर, कष्टकरी शेतकरी आणि जे काही अशिक्षित असतील ते, असे सगळे मिळून चार-पाच कोटी लोक महाराष्ट्रात असे आहेत, ज्यांच्यापर्यंत वृत्तपत्र पोहोचतच नाही. तेव्हा ‘अमुक एक वृत्तपत्र, अमुक एक वाचकांचे’ असा हिशेब लावला तरी या चार-पाच कोटी लोकांपर्यंत कोणतेच वृत्तपत्र पोहोचत नाही. त्यांचे व्यासपीठ कोणते? आणि त्यांचे प्रश्न मांडणारे कोण? मुळात त्यांच्या प्रश्नापर्यंत जाऊन ते प्रश्न आपल्या वृत्तपत्रात लावून धरणारी वृत्तपत्रे किती आहेत? शेवटी वृत्तपत्र ही जर चावडी असेल, तर सामान्य माणसाच्या प्रश्नाचा आवाज उठवणारे ते व्यासपीठ असायला हवे. पण एकीकडे आजची चॅनेल जशी ‘ब्रेकिंग न्यूज’मध्ये अडकली आहेत, तशी आजची बहुसंख्य मराठी वृत्तपत्रे ‘पेड न्यूज’मध्ये अडकलेली आहेत. मराठी पत्रकारितेची सगळ्यात मोठी बदनामी ‘पेड न्यूज’ने करून टाकलेली आहे. आम्ही आमची विश्वासार्हता आमच्या हातांनी गमावलेली आहे. राजकारण्यांची विश्वासार्हता संपत आली, असे आम्ही राजरोस लिहू शकतो. पण, आमच्या विश्वासार्हतेचा पंचनामा सामान्य माणूस अगदी सहजपणे करतो आहे. त्या वाचकाने वृत्तपत्रांना फार गांभीर्याने घेतलेले नाही, हे आमचे आम्हीच समजून घेणे गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वी नांदेडला गेले होते. तेथील एका मोठ्या नेत्याविरुद्ध एक बातमी स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती. एका उपाहारगृहात चहा घेत असताना बाजूच्या टेबलावरचे लोक ती बातमी वाचत होते. त्यावर त्यांचा सहज उद्गार होता की, ‘तोडपानी नही होगा’. ते शब्द ऐकून  मेंदूला झिणझिण्या आल्या. आम्हा पत्रकारांची विश्वासार्हता किती ढासळली आहे, याचे ते जिवंत उदाहरण होते. राजकीय  नेते, कार्यकर्ते तोडपाणी करतात. आम्हीही तोडपाणी करतो. बाळशास्त्री जांभेकरांच्या ‘दर्पण’मध्ये चेहरा पाहण्याची गरज आज तीव्रतेने जाणवते आहे, ती यामुळेच. आम्ही गृहीत धरले गेलो आहोत. कुणाच्या तरी खिशात बसलो आहोत. काही अपवादात्मक पत्रकारिता आणि वृत्तपत्रे सोडली, तर कोणत्याही विषयात ‘मालपाणी’ चर्चा केल्याशिवाय आमची गाडी  पुढे सरकत नाही.आजच्या काळातील वृत्तपत्रे किती निर्भीड आहेत, त्यापेक्षा ती कोणाच्या दबावाखाली किती आहेत, याचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. असेही सांगितले जाते की, मालकांचा खूप त्रास असू शकतो. माझा अनुभव असा आहे की,मालकांचा त्रास,’ म्हणून जे सांगितले जाते, तसा एक टक्कासुद्धा त्रास मालक देत नाहीत. पण ‘पेड न्यूज’ची भानगड सुरू झाल्यापासून वृत्तपत्रांचे मालकही ‘लावोलावो’च्या आहारी गेले आहेत. त्यामुळे बातमीचे सगळे राजकारण हे अर्थकारणाशी जोडले गेलेले आहे. जिथपर्यंत बातमीच्या अर्थकारणात घुसलेल्या पत्रकारितेला बाहेर काढून निखळ बातमीशी जोडले जात नाही, तिथपर्यंत ‘पत्रकार दिन’ साजरा केला तरी जांभेकर, आंबेडकरांशी आमचे नाते सांगण्याचे चारित्र्य आमच्याजवळ राहिलेले नाही, हे संकोच न करता कबूल केले पाहिजे. असो ….. मी जर दुसऱ्यांना बदलू शकत नाही तरी, स्वतः जशी आहे तशी राहू शकते. काळाच्या विपरीत जाऊन, प्रामाणिक पत्रकारितेला जेवढे जपता येईल तेवढे जपीन, ज्या दिवशी शक्य होणार नाही त्या दिवशी परत ह्या मार्गाने येणार नाही पण स्वतःच्या स्वाभिमानाला धक्का लागू देणार नाही. कोणतीही तडजोड करणार नाही. मी वृत्तपत्र लोकांना घाबरवण्यासाठी चालवत नाही, तर वृत्तपत्र आणि माझी अस्मिता जपून काम करते.

 

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments