Saturday, April 20, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखभाजपासाठी चिंताजनक!

भाजपासाठी चिंताजनक!

संपूर्ण देशभराच्या नजरा लागलेल्या गुजरात निवडणूकीत भाजपा काठावर पास झाली. ज्या गुजरातमध्ये भाजपा २२ वर्षापासून सत्तेत आहे त्या, भाजपाला काँग्रेसशी कडवी झुंझ द्यावी लागली. आरोप प्रत्यारोप झाले. पुन्हा सत्ता कायम राखण्यात भाजपाला यशही मिळाले परंतू हा निकाल भाजपासाठी चिंताजनक आणि विचार करणारा आहे. गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी,राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांची अब्रु वाचवण्यासाठी भाजपाशासीत प्रदेशचे संपूर्ण मुख्यमंत्री,केंद्रीय मंत्री, देशातील सर्व पदाधिकाऱ्यांनी गुजरातमध्ये प्रचारासाठी ‘येडीचोटी का जोर’ लावला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या ‘होमपीचवर’ झालेल्या लढाईत भाजपाने सर्व यंत्रणेला कामाला लावून सुध्दा निवडणूक जिंकण्यासाठी नाकी नऊ आले होते. काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी राहुल गांधीनी गुजरात पिंजून काढला. या सर्व परिस्थितीत सत्ताधाऱ्यांची हवा टाईट झाली. गुजरातमध्ये राहुल गांधी यांनी प्रचाराची धुरा सांभाळून एक चांगली सुरुवात केली. मागच्या वेळा पेक्षा २५ जागा जास्त निवडून आल्यात. यामुळे काँग्रेसचे मनोबल वाढले. भाजपाच्या सोळा जागा कमी झाल्या ही बाब ही भाजपासाठी चिंताजनक आहे. खरतर भाजपाने गुजरात विकास मॉडलेच्या नावाने देशात सत्ता काबीज केली होती. परंतु त्याच गुजरातमध्ये त्यांच्यासाठी ही निवडणूक काँग्रेसच्या झंझावती प्रचारामुळे त्रासदायक ठरली. भाजपला गुजरातमध्ये ४८.९ टक्के मतं मिळाली आहेत. तर काँग्रेसला ४२ टक्के नागरिकांचं समर्थन मिळालं आहे. ३४,५०,७६१ मतदारांनी भाजपला मत दिलं असून काँग्रेसच्या बाजूने २९,६८,१५२ नागरिकांनी मतदान केलं. तर अपक्ष ४ टक्के, बसपा ०.७ टक्के, राष्ट्रवादीच्या ०.७ टक्के मतं मिळाली आहेत. नोटाच्या आकड्यांवर नजर टाकली तर १.८ टक्के म्हणजेच सुमारे सव्वा पाच लाख मतदारांनी कोणत्याही उमेदवाराला मत दिलं नाही. ५,२४,७०९ मतदारांनी भाजप किंवा काँग्रेस उमेदवारांना मत न देता नोटाचं बटण दाबलं, जो एक मोठा आकडा आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व इतर काही नेत्यांनी १५० जागांवर विजय होईल अशा बाता मारल्या होत्या. खरतर भाजपाला शंभरी पार करता आली नाही. याचाच अर्थ जनतेने त्यांना एका प्रकारे नाकारले. हिमाचलप्रदेश भाजपाने काँग्रेसकडून हिसकावून घेतले. हिमाचलमध्ये दर पाच वर्षांनी सत्ता परिवर्तन होत असते. त्यामुळे भाजपाला खूश होण्याचे कारण नाही. भाजपाने गुजरातमध्ये चांगला विकास केला असता तर त्यांच्या जागांमध्ये वाढ झाली असती परंतु त्यांच्या संख्येत घट झाली. पटेल,पाटीटार,आदीवासी,दलित अशा जाती धर्माच्या मतदारांकडे सर्वच पक्षाची नजर होती. प्रचारादरम्यान गुजराती अस्मिता अनेक मुद्यांचा वापर झाला. मात्र विकासाच्या मुद्यावर भाजपाकडून प्रचार झाला नाही. भाजपाने केलेली कामे जनतेसमोर ठेवली असती तर त्यांचा एकतर्फा विजय झाला असता. परंतु विकास करण्यासाठी कोणतेही मुद्दे नव्हते त्यामुळे राहुल गांधी यांची जात,पाकिस्तान,अशा मुद्यांवर त्यांनी निवडणूक लढली. मात्र असले राजकारण हे देशाच्या लोकशाहीसाठी घातक आहे. तरी सुध्दा भाजपा राष्ट्रीय पक्ष असून त्यांच्यासाठी गुजरात निकाल हा चिंताजनक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments