Friday, March 29, 2024
Homeसौंदर्यनैसर्गिकरित्या सुंदर दिसण्यासाठी कृत्रिम उपाय

नैसर्गिकरित्या सुंदर दिसण्यासाठी कृत्रिम उपाय

सौंदर्योपचार आपण घरच्याघरी हे सौंदर्योपचार   अगदी सोप्या पध्दतीनं करू शकतो. आणि याला वेळही एकदम कमी लागतो. आपल्या त्वचेचं आणि केसांचं सौंदर्य जपण्यासाठी कोणतंही बाहेरचं उत्पादन आणण्याची गरजच नाही.

कामातून स्वत:ला वेळ देणं बायकांसाठी अगदीच अवघड होवून जातं. कामांच्या भाऊगर्दीत आपल्या सौंदर्यासाठी काही करायला हवं हे ही बायका विसरून जातात. किंबहुना एवढी कामं असताना ‘हा कसला टाइमपास’असंही याकडे पाहिलं जातं. खरंतर मनातून आपण आपल्या त्वचेची, आपल्या केसांची काळजी घ्यायला हवी असं अनेकजणींना वाटतं. मग त्यावर उपाय म्हणून दुकानात जावून आयते क्रीम आणि फेसपॅक आणले जातात. पण खरंतर या उपायांनी फायदा होण्यापेक्षा त्यातील केमिकल्समुळे अपाय होण्याचीच शक्यता जास्त.

खरंतर आपल्या त्वचेचं आणि केसांचं सौंदर्य जपण्यासाठी कोणतंही बाहेरचं उत्पादन आणण्याची गरजच नाही. हे सौंदर्योपचार आपण घरच्याघरी अगदी सोप्या पध्दतीनं करू शकतो. आणि याला वेळही एकदम कमी लागतो.

नैसर्गिक ब्लॅकहेड रिमूव्हर

बेकिंग पावडर सौंदर्योपचारात खूप उपयोगाची ठरते. प्रत्येकीच्या स्वयंपाकघरात बेकिंग पावडर असतेच. बेकिंग पावडरमुळे त्वचेवरच्या मृत पेशी निघून जातात. यासाठी एक चमचा बेकिंग सोडा घ्यावा. आणि पेस्ट करण्यासाठी शक्यतो मिनरल वॉटर वापरावं. पेस्ट तयार करताना बेकिंग सोडयात थोडं पाणी घालावं. ब्लॅक हेडस प्रामुख्यानं नाकावर असतात. त्यामुळे ही पेस्ट नाकावर लावावी. ती पूर्ण सुकू द्यावी. दहा पंधरा मिनिटानंतर पाण्यानं ती धुवावी.

तेलकट केसांसाठी नैसर्गिक शाम्पू

अनेकींना केस रोज धुवावेसे वाटतात. पण रोज शाम्पूनं केस धुतल्यास केस खराब होतात. केस स्वच्छ होण्यासोबतच केसांचं पोषण होणंही गरजेचं. यासाठी घरच्या घरी शाम्पू बनवता येतो. या शाम्पूनं केस रोज स्वच्छ केले तरी केसांचं नुकसान होत नाही. हा शाम्पू बनवण्यासाठी अडीच चमचा कॉर्न स्टार्च लागतो. कॉर्न स्टार्च हा सेंद्रिय असला तर उत्तम. आणि 3-4 थेंब लव्हेंडर किंवा गुलाबाचं तेल हवं. या दोन्ही गोष्टी एकत्र कराव्या. हे मिश्रण केसांना हलक्या हातानं चोळावं. पाच मिनिटं ते केसांवर तसंच राहू द्यावं. पाच मिनिटानंतर केस केसांच्या ब्रशनं स्वच्छ करावेत. कॉर्नस्टार्च हे केसांमधलं जास्तीचं तेल शोषून घेतं. आणि केस स्वच्छ ठेवतं

उजळ त्वचेसाठी नैसर्गिक पॅक

उजळ त्वचेसाठी दुकानातल्या गोष्टी नाही तर स्वयंपाकघरातले जिन्नसच उपयोगी पडते. उजळ त्वचेसाठी बेसनपीठ फार उपयुक्त असतं. आणि बेसनपीठ जर दुधात कालवून लावलं तर चेहेरा उजळ आणि मऊही होतो. यासाठी दोन चमचे बेसनपीठ आणि एक चमचा कच्चं दूध घ्यावं. दोन्ही व्यवस्थित एकत्र करावं . हा लेप चेहे-यास लावावा. दहा मिनिटं हा लेप सुकु द्यावा आणि नंतर चेहेरा कोमट पाण्यानं धुवावा.

दात चमकवण्यासाठी

यासाठी बेकिंग सोड्याचा उत्तम उपयोग होतो. एक चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा लिंबाचा रस घ्यावा. दोन्ही गोष्टी एकत्र करून ही पेस्ट दातांवर घासावी. एक दोन मिनिटं ही पेस्ट तशीच ठेवून नंतर गुळण्या कराव्यात. हा उपाय रोज केला तरी चालतो.

नैसर्गिक स्कीन टोनर

त्वचा स्वच्छ करण्यासाठी टोनरची आवश्यकता असते. चांगल्या प्रतीचा टोनर हा त्वचा स्वच्छ करण्यासोबतच त्वचा पुरेशी ओलसर ठेवतो. त्वचेला ऊर्जा देतो. यासाठी कोरफडीचा गरच हवा. कोरफडीचा गर हे सर्व करू शकतो. यासाठी कोरफडीची पात कापावी. त्यातला गर चमच्यानं काढावा. आणि तो गर चेहेरा आणि मानेस लावावा. पंधरा मिनिटानंतर कोमट पाण्यानं चेहेरा धुवावा.

नैसर्गिक मेकअप रिमूव्हर
चेहे-यावरचा मेकअप काढण्यासाठी नारळाचं तेल वापरावं. नारळाचं थोड तेल घेवून त्यानं हलका मसाज केल्यानं मेकअप निघून जातो, चेहेरा स्वच्छ होतो. तसेच त्वचेला मॉश्चरायझरही मिळतं. तेलानं थोडा मसाज करून दहा मिनिटं चेहेरा तसाच ठेवावा. आणि नंतर पाण्यानं धुवावा.

नैसर्गिंक परफ्युम
कपड्यांवर परफ्युम मारून किंवा बॉडी स्प्रे मारून तात्पुरता सुंगध मिळतो. त्वचेला जर नैसर्गिक घटकांच्या साहाय्यानं सुंगधीत केलं तर छान प्रसन्न वाटतं. यासाठी गुलाब, लव्हेंडर तेलाचे आठ ते दहा थेंब घ्यावेत. चार पाच चमचे फिल्टरमधलं पाणी घ्यावं आणि एक चमचा ग्लिसरीन घ्यावं. हे सर्व नीट एकत्र करावं. स्प्रेची रिकामी बाटली घेवून हे मिश्रण त्यात भरावं. आणि बाहेर जातांना हा स्प्रे फवारावा. दिवसभर यामुळे ताजतवानं वाटतं.

नॅचरल वॅक्स
चेहे-यावरचे केस लपवण्यासाठी ब्लीच केलं जातं. पण ब्लीचमुळे त्वचेचं नुकसान होतं. यासाठी नॅचरल वॅक्स उत्तम पर्याय ठरतो. यामुळे चेहे-यावरचे केस कोणतीही हानी न होता जातात. यासाठी अडीच कप पिठी साखर घ्यावी. अर्धा कप लिंबाचा रस घ्यावा. आणि दोन कप पाणी घ्यावं. हे सर्व एकत्र करून आठ ते मिनिटं हे मिश्रण गरम करावं. या मिश्रणाचा रंग सोनेरी तपकिरी होईपर्यंत ते उकळावं. नंतर गॅस बंद करून ते मिश्रण गार होवू द्यावं. चिकट व्हॅक्स तयार होतं. ते फ्रीजमध्ये ठेवावं. जेव्हा लागेल तेव्हा ते बाहेर काढून ते चेहेºयास लावून त्यावर कापड ठेवावं. आणि उलट्या दिशेनं कापड ओढावं. केस निघून जातात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments