केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ नाकारला

- Advertisement -

जोधपूर, राजस्थानातील जोधपूरमध्ये  २५० पेक्षा जास्त पोलीस हवालदार सोमवारी सुटीवर होते. तसेच यापैकी काही जणांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यास नकार दिला. सोमवारी राजनाथ सिंह जोधपूरमध्ये होते तेव्हा ही घटना घडली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. पगारात घट केल्याचे  कारण देत पोलीस हवालदारांनी हे आंदोलन केल्याचेही समजते आहे.

गृहमंत्र्यांना पोलीस हवालदारांनी ‘गार्ड ऑफ ऑनर’ नाकारल्याचे कळताच सुटी रद्द केल्याचे फर्मान जोधपूर पोलीस आयुक्त अशोक राठोड यांनी काढले. तसेच ज्यांनी नकार दिला त्या पोलिसांविरोधात कडक कारवाई केली जाईल असाही इशारा राठोड यांनी दिला. कोणत्याही प्रकारची बेशीस्त आम्ही खपवून घेणार नाही असेही पोलीस उपमहासंचालक अजित सिंह यांनी स्पष्ट केले.

पोलीस हवालादारांचा पगार २४ हजारावरून १९ हजार करण्यात येईल असा एक मेसेज राजस्थानात व्हॉट्स अॅपवर फिरतो आहे. त्याचमुळे पोलिसांनी ‘गार्ड ऑफ ऑनर’ नाकारल्याची माहिती समजते आहे. ही अफवा नेमकी कोणी पसरवली याची माहिती घ्या असे आदेश पोलीस उपमहासंचालक अजित सिंह यांनी दिले आहेत.

- Advertisement -
- Advertisement -