Friday, March 29, 2024
Homeविदेशजगाचं फुफ्फुस म्हणून ओळखलं जाणारं अॅमेझॉनचं जंगल आगीच्या विळख्यात

जगाचं फुफ्फुस म्हणून ओळखलं जाणारं अॅमेझॉनचं जंगल आगीच्या विळख्यात

साओ पाओलो : दक्षिण अमेरिका खंडातील ब्राझीलमध्ये असलेलं जगातील सर्वात मोठं जंगल आणि जगाचं फुफ्फुस म्हणून ओळखलं जाणारं अॅमेझॉनचं जंगल आगीत धुमसत आहे. इथे दरवर्षी आगीच्या अनेक घटना समोर येतात, पण सध्याच्या आगीने रौद्र आणि भयावह रुप धारण केलं आहे. तीन आठवड्यांपूर्वी लागलेली आग अजूनही तशीच आहे. या आगीमुळे अॅमेझॉन, रोडांनिया आणि साओ पाओलोमध्ये भरदिवसा अंधार झाला आहे. आगीमुळे ब्राझीलचं 2700 किमी क्षेत्र प्रभावित झालं आहे.

या भीषण आगीच्या ज्वाळांमधून निघणारा धूर अंतराळातूनही पाहता येऊ शकतो. जागतिक हवामान संघटनेच्या आकडेवाडीनुसार वायव्येतील पर्जन्य वृष्टीपासून अटलांटिक किनाऱ्यावरुन हजारो मैल दूर असलेल्या रिओ दे जनेइरोपर्यंत धूर पसरला आहे.वर्षभरात 72000 हून अधिक ठिकाणी जंगलात आगीने पेट घेतला असून ब्राझीलचं अंतराळ संशोधन केंद्राच्या आयएनपीईनुसार मागील गुरुवारपासून आगीचं प्रमाण वाढल्याचं दिसलं आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत अॅमेझॉन जंगलात लागलेल्या आगीत 83 टक्क्यांनी वाढ झाली आहे. धुराच्या ढगांमुळे उत्तरेकडील रोरायमा राज्य कोरडे पडले आहे. अॅमेझॉनस राज्याने आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे. आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर आणि अटलांटिक महासागरामध्येही धुळीच्या कणांचे ढग पसरले आहेत.

ब्राझीलच्या अध्यक्षांचा एनजीओवर आरोप
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बॉल्सनोरो यांनी आगीसाठी जंगलतोड करणाऱ्या कंपन्यांना जबाबदार ठरवलं आहे. अॅमेझॉन जंगलात ब्राझीलने विकासकामासाठी काही ठिकाणी वृक्षतोड केली. त्यानंतर ब्राझीलचे अध्यक्ष जैर बॉल्सनोरो यांनी जंगलतोड करणाऱ्या कंपन्यांना काम काम थांबवण्यास सांगितलं. आर्थिक मदत कमी केल्याने त्याच कंपनीने ही आग लावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बॉल्सनोरो म्हणाले की, या कंपनीचा अॅमेझॉन जंगलात जाण्यामागचा उद्देश हा आग लावण्याचाच होता. राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या दाव्यांबद्दल पुरावे मागितले असता ते म्हणाले की, याचा कोणताही लेखी पुरावा माझ्याकडे नाही, या गोष्टी अशा केल्या जात नाहीत.या आगीत अॅमेझॉन जंगलात राहणारे काही आदिवासींचा मृत्यू झाला आहे, तर काही जखमी आहेत. जंगलातील प्राण्यांचे तर स्थिती अतिशय वाईट आहे.  ठिकठिकाणी मृत प्राणी वा त्यांचे अवशेष दिसत आहेत.

जगभरात सेलिब्रिटींकडून चिंता
आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी कॅमिला कॅबेलो, अरियाना ग्रेंडे, लिओनार्डो दि कॅप्रिओ,जीजी हदीद मॉडेल, केंडाल जेन्नर, जेडन स्मिथ, नोव्हा सायरस आणि अनेक सेलिब्सनी या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. हे कलाकार या घटनेबद्दल ट्विटर, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जनजागृती करत आहेत.

फक्त हॉलिवूड नाही तर बॉलिवूडचे कलाकारांनीही याबद्दल ट्विटर आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ही घटना लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. भूमी पेडणेकर, अनुष्का शर्मा, अर्जुन कपूर, अक्षय कुमार, दिया मिर्झा, दिशा पाटणी, आयुष्मान खुराना यांनीही अॅमेझॉनच्या आगीबद्दल विविध पोस्ट केल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments