अमेरिकेतील मॅनहटन येथे ट्रकने ८ जणांना चिरडले

- Advertisement -

वॉशिंग्टन – अमेरिकेतील लोअर मॅनहटन येथील दुचाकीस्वारांसाठी राखीव असलेल्या गर्दीच्या रस्त्यावर एका बंदूकधारी व्यक्तीने बेदरकारपणे ट्रक चालविल्याने ८ जण ठार तर ११ जण जखमी झाल्याची घटना घडली. अमेरिकेच्या सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेला दहशतवादी हल्ला असल्याचा अंदाज व्यक्त केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅनहटन शहरातील हडसन नदीच्या किनाऱ्यावर दुचाकी स्वारांसाठी रस्ता बनविण्यात आला आहे. या रस्त्यावरील पादचाऱ्यांना एका ट्रक चालकाने भरधाव वेगात चिरडले. या घटनेमुळे धावपळ उडाली असता येथील एका गाडीतून गोळीबार सुद्धा करण्यात आला. या घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले आहेत. याची माहिती मिळाताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून त्यांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्याच्याकडील असलेली शस्त्रे जप्त केली असून पुढील तपास सुरू केला आहे. याचबरोबर, जखमींना जवळच्याच रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हा दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

- Advertisement -