Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeविदेशजो बायडन यांच्या प्रशासनात भारतीयांचा डंका; २० जणांची नियुक्ती

जो बायडन यांच्या प्रशासनात भारतीयांचा डंका; २० जणांची नियुक्ती

वॉशिंग्टन: अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष  जो बायडन २० जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. बायडन यांच्या प्रशासनात महत्त्वाच्या पदांची जबाबदारी १३ महिलांना देण्यात आली. भारतीय वंशाच्या २० जणांना प्रशासनात स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्यातील १७ जण व्हाइट हाउसमध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडणार आहेत.

अमेरिकेच्या लोकसंख्येत भारतीय वंशाच्या नागरिकांची संख्या एक टक्क्यांच्या आसपास आहे. त्या तुलनेत भारतीय वंशाच्या नागरिकांना अधिक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी मिळत आहे. २० जानेवारी रोजी जो बायडन राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील. तर, कमला हॅरीस  या उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. कमला हॅरीस यांच्या आई या भारतीय होत्या. अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदाची जबाबदारी पहिल्यांदाच महिलेकडे जाणार आहे.

अमेरिकन सर्जन जनरल म्हणून डॉ. विवेक मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, वनिता गुप्ता यांना कायदे मंत्रालयाच्या सहाय्यक अॅटर्नी जनरल म्हणून नियुक्ती केली आहे. परराष्ट्र सेवा माजी अधिकारी उजरा जेया यांना असैन्य सुरक्षा, लोकशाही आणि मानवाधिकाराबाबत अवर परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

भारतीय वंशाच्या समीरा फाझिली यांची राष्ट्रीय अर्थ मंडळाच्या उपसंचालक पदावर नियुक्ती केली आहे. व्हाइट हाउसमधील अर्थ खात्याशी संबंधित हे महत्त्वाचे पद आहे. अर्थ धोरण ठरविण्याच्या प्रक्रियेचा समन्वय आणि अर्थधोरणाविषयी अमेरिकी अध्यक्षांना सल्ला देण्याचे काम अर्थ मंडळाच्या उपसंचालकांकडे असते.

फाझिली यांची नियुक्ती यापूर्वी ‘फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ अटलांटा’ येथे होती. ‘एंगेजमेंट फॉर कम्युनिटी अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट’च्या संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्या मूळच्या काश्मीर येथील आहेत. डिसेंबर महिन्यात आएशा शाह यांची व्हाइट हाउसमध्ये ‘पार्टनरशिप मॅनेजर’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आएशा याही मूळच्या काश्मीरमधील रहिवासी आहेत. ओबामा यांच्या कार्यकाळात फाझिली यांनी वरिष्ठ धोरण सल्लागार म्हणून काम केले आहे.

 भारतीय वंशाच्या तिघांची नियुक्ती व्हाइट हाउसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत स्थान मिळाले आहे. तरुण छाबडा यांना तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय सुरक्षेचे वरिष्ठ संचालक, सुमोना गुहा यांना दक्षिण आशिया विभागासाठी वरिष्ठ संचालक आणि शांती कलाथिल यांना लोकशाही व मानवाधिकार समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments