फटाकेबंदीच्या निर्णयाला जातीय रंग दिला जात असल्याचं दु:ख – सर्वोच्च न्यायालय

- Advertisement -

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने फटाकेबंदीवर दिलेला आपला निर्णय बदलण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पुढील सुनावणी होईपर्यंत दिल्ली आणि एनसीआर परिसरातील फटाक्यांच्या विक्रीवर बंदी कायम राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी निर्णय सुनावताना दिल्ली-एनसीआर येथे फटाक्यांची विक्री आणि साठ्यावर बंदी आणली. आपला नोव्हेंबर २०१६ मधील आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.

सर्वोच्च न्यायालयाने निर्णय कायम ठेवताना फटाकेबंदीच्या निर्णयाला जातीय रंग दिला जात असल्याचं दु:ख होतयं असं सांगितलं. दिवाळीनंतर प्रदूषणात काही फरक पडला का हे आम्ही पडताळून पाहणार आहोत असंही न्यायालयाने यावेळी सांगितलं. दरम्यान पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने फटाके उडवण्यासाठी परवानगी दिली असून वेळेची अट ठेवली आहे. रात्री ६.३० ते ९.३० दरम्यान फटाके वाजवण्याची परवानगी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दिली असून, आदेशाचं पालन होतंय की नाही यासाठी पीसीआर व्हॅन लक्ष ठेवणार आहे.

- Advertisement -

त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हिंदूविरोधी असल्याचं म्हटलं होतं. ट्विटरच्या माध्यमातून तथागत रॉय यांनी आपली नाराजी व्यक्त करत निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने फटाकेबंदीचा दिलेला निर्णय गतवर्षी असहिष्णूता वाढल्याचा आरोप करत पुरस्कार परत करणा-या कलाकार आणि लेखकांपासून प्रभावित झाल्याचंही तथागत रॉय बोलले होते.

ट्विटरवरुन तथागत रॉय यांनी आपला संताप व्यक्त केला होता. ‘कधी दहीहंडी, आज फटाके, उद्या कदाचित प्रदूषणाचा दाखला देत मेणबत्ती आणि पुरस्कार वापसी गँग हिंदूंच्या चिता जाळण्याविरोधात याचिका करेल’, असं ट्विट करत तथागत रॉय यांनी पुरस्कार परत करणा-यांवर टीका केली.

लेखक चेतन भगत यांनीदेखील निर्णयावर नाराजी व्यक्त करत फक्त फक्त हिंदूंच्या सणांवरच कारवाई का ? असा प्रश्न विचारला होता. फटाक्यांविना मुलांसाठी दिवाळीचा अर्थ काय ? असा प्रश्न चेतन भगत यांनी विचारला. चेतन भगत यांनी एकामागोमाग एक सलग ट्विट करत आपली नाराजी जाहीर केली होती.

- Advertisement -