Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeदेश‘रोहित वेमुलाची आत्महत्या हा सरकारनं केलेला खूनच’

‘रोहित वेमुलाची आत्महत्या हा सरकारनं केलेला खूनच’

अहमदाबाद: गुजरात दौऱ्यावर असलेल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी असलेल्या रोहित वेमुलाच्या मृत्यूवरुन मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. रोहित वेमुलाचा मृत्यू आत्महत्या नसून तो भारत सरकारकडून करण्यात आलेला खून आहे,’ अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी सरकारला लक्ष्य केले. अहमदाबादमध्ये दलित स्वाभिमान सभेला संबोधित करताना राहुल गांधींनी रोहित वेमुलाच्या मृत्यूवर भाष्य केले. हैदराबाद विद्यापीठात शिकणाऱ्या रोहित वेमुलाने आत्महत्या केली नव्हती. तर भारत सरकारने त्याची हत्या केली,’ असे म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला.

‘रोहित वेमुला विद्यापीठात जाऊन शिक्षण घेण्याची हिंमतच कशी काय करु शकतो? असे पत्र मंत्र्यांकडून येते आणि त्याची हत्या केली जाते,’ असे राहुल गांधींनी म्हटले. हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुलाने १७ जानेवारी २०१६ मध्ये वसतिगृहाच्या खोलीत आत्महत्या केली होती. विद्यापीठाकडून शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याने तणावग्रस्त स्थितीत त्याने हे पाऊल उचलले, अशी शक्यता त्यावेळी व्यक्त करण्यात आली होती.

रोहित वेमुलाच्या आत्महत्येचे देशभरात पडसाद उमटले होते. तत्कालीन मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्यावर या प्रकरणी मोठी टीका झाली होती. यासोबतच केंद्रीय कामगार मंत्री बंडारु दत्तात्रय यांनाही विरोधकांनी लक्ष्य केले होते. या प्रकरणात बंडारु दत्तात्रय यांनी पत्रव्यवहार केल्याने काँग्रेससह सर्वच विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरले होते. दोन मंत्री एकाच प्रकरणात वादात सापडल्याने त्यावेळी मोदी सरकार कोंडीत सापडले होते.

गुजरात दौऱ्यावर असलेल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज सकाळी मच्छिमारांशीही संवाद साधला. काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास मच्छिमारांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करु, असे आश्वासन राहुल गांधींनी दिले. गुजरातमध्ये ९ आणि १४ डिसेंबरला मतदान होणार आहे. तर १८ डिसेंबरला मतमोजणी पार पडेल. २२ वर्षांपासून गुजरातमध्ये सत्तेत असलेल्या भाजपसमोर यंदा काँग्रेसने आव्हान उभे केले आहे. याशिवाय पाटीदार, दलित आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांचे आव्हानदेखील भाजपसमोर आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments