Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशराज ठाकरेंचे ‘कमल’ हसन, भाजपच्या ‘कमळ”वर व्यंगचित्रातून फटकारे!

राज ठाकरेंचे ‘कमल’ हसन, भाजपच्या ‘कमळ”वर व्यंगचित्रातून फटकारे!

मुंबई: राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या कुंचल्यातून एक अनोखे व्यंगचित्र साकारत भाजपावर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेते कमल हसन यांनी राजकारणात प्रवेश केला. तामिळनाडूत कलाकारांनी राजकारणात येण्याची परंपराच आहे. मात्र याच प्रवेशावर टीका करत राज ठाकरे यांनी भाजपालाही लक्ष्य केले आहे. याचीच सर्वत्र चर्चा रंगली आहे.

व्यंगचित्रात काय रेखाटण्यात आले….

तामिळनाडू नावाचा एक तलाव दाखवण्यात आला आहे. या तलावात एक भलेमोठे कमळ उगवले आहे. या कमळाच्या पानांवर ‘कमल’ असे लिहिण्यात आले आहे. तर कमळाच्या पाकळ्यांवर तामिळ अस्मिता असे लिहिण्यात आले आहे. या भल्या मोठ्या कमळाच्या मध्यभागी अभिनेता कमल हसन उभा आहे. तर तलावात एक छोटे कमळही आहे. ते कमळ भाजपाचे आहे असे दाखवण्यात आले आहे. तलावाच्या किनाऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उभे आहेत. साहेब, हे अचानक कुठून उगवले आता? असे अमित शहा नरेंद्र मोदींना विचारत आहेत असे या व्यंगचित्रात रेखाटण्यात आले आहे.

तामिळनाडूत जयललिता यांच्या मृत्यूनंतर भाजपाने राजकारणातील दोन गटांना आपल्याकडे वळविण्यात यश मिळवले आहे. अशात कमल हसन यांच्या भोवतीचे असलेले प्रसिद्धीचे वलय आणि त्यांची लोकप्रियता याचा त्रास भाजपाला होऊ शकतो. त्याच त्रासातून भाजपा कमल हसन यांच्या राजकीय प्रवेशाकडे कसे पाहते यावर या व्यंगचित्रात भाष्य करण्यात आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर हे व्यंगचित्र पोस्ट केले आहे. राज ठाकरे यांची याआधीची व्यंगचित्रेही त्या त्या प्रसंगावर चपखल भाष्य करणारी होती. त्याचप्रमाणे हे व्यंगचित्रही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. तसेच हे व्यंगचित्र अनेक नेटकऱ्यांनी शेअरही केले आहे.

याआधीही ज.लोया प्रकरण, महाराष्ट्राची अस्मिता, नीरव मोदी प्रकरण, मोहन भागवत यांनी जवानांबाबत केलेल्या वक्तव्यानंतरचे व्यंगचित्र, विकासाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली, शिवसेना आणि भाजपा यांच्यात चाललेल्या वादावरचे व्यंगचित्र अशी अनेक व्यंगचित्रे राज ठाकरे यांनी पोस्ट केली आहेत. त्या व्यंगचित्रांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता तामिळनाडूच्या राजकारणावर भाष्य करणारे व्यंगचित्र त्यांनी पोस्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments