कॅनडा पंतप्रधानांची पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग भेट घेणार!

- Advertisement -

नवी दिल्ली: एनएसजीमध्ये भारताच्या सदस्यत्वाचे समर्थन करणाऱ्या कॅनडाकडून उपस्थित करण्यात आलेल्या शंकांचा भारताने खुलासा केला. दरम्यान, भारत दौऱ्यावर आलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुडो यांच्या दौऱ्यावरून नाराजी व्यक्त करणारे पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे बुधवारी त्यांची भेट घेणार आहेत.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुडो आठवड्याच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. परंतु, त्रुडो यांना भारत दौऱ्यात योग्य तो सन्मान मिळाला नसल्याचे वृत्त माध्यमांत येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने स्पष्टीकरण देताना त्रुडो यांच्या दौऱ्यात शिष्टाचाराचे पालन करण्यात आल्याचे म्हटले आहे. सात दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले त्रुडो गुजरात दौऱ्यावर गेल्यानंतर त्यांच्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हते. इतकेच काय तर विमानतळावर पंतप्रधान त्यांच्या स्वागतासाठीही आले नव्हते. याच सर्व घटनांचा मुद्दा बनवत कॅनडातील माध्यमांनी भारतविरोधात वृत्त प्रसिद्ध केले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, शिष्टाचार लक्षात घेता त्रुडो यांचे स्वागत एका राज्यमंत्र्याने केले होते. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी झिनपिंग यांचेही स्वागत करण्यासाठी विमानतळावर गेले नव्हते. हे समजण्याची गरज आहे. एखाद्या पाहुण्याला घ्यायला जाणे किंवा त्यांना निरोप देण्यासाठी विमानतळावर जाणे हा एक खास क्षण असतो. हे काही पाहुण्यांपुरतेच मर्यादित राहिले आहे. मोदींनी आतापर्यंत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे, अबु धाबीचे राजकुमार मोहम्मद बिन जायद अल नहयान, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना आणि इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचेच स्वागत करण्यासाठी विमानतळावर गेले होते.

शनिवारी जेव्हा त्रुडो दिल्लीत पोहोचले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी ताजमहल पाहण्याचे नियोजन केले. त्यानंतर ते अहमदाबाद आणि मुंबईसाठी रवाना झाले. त्रुडो बुधवारी अमृतसरचा दौरा करतील. त्यानंतर शुक्रवारी ते दिल्लीला येतील. तिथे त्यांचे अधिकृतरित्या स्वागत होईल आणि पंतप्रधान मोदींबरोबर त्यांची बैठक होईल. भारत भ्रमण करत असलेल्या त्रुडो यांना इतर ठिकाणी जाण्यापूर्वी सर्वात प्रथम दिल्लीला येण्याचा सल्ला देण्यात आला होता. पण त्रुडो आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी स्वत:च अहमदाबादला जाण्याचे नियोजन केले होते. मोदींनी त्यांना अहमदाबादला जाण्याची परवानगीही दिली नव्हती. कॅनडातील माध्यमांनी पंतप्रधान मोदी हे झिनपिंग, आबे आणि नेतन्याहू यांच्या दौऱ्यावेळी स्वत: अहमदाबादला आले होते. पण त्रुडो यांच्यावेळी ते आले नसल्याचे अधोरेखित केले आहे.

- Advertisement -

त्रुडो हे खलिस्तानींचे समर्थक मानले जातात. त्यांनी शिखांच्या फुटीरवादी आंदोलनातील लोकांना आपल्या कॅबिनेटमध्ये स्थान दिले होते. त्यामुळे भारताबरोबरील संबंधात थोडा दुरावा निर्माण झाला होता. त्रुडोंच्या कॅबिनेटमध्ये सध्या चार शीख मंत्री आहेत. यामध्ये हरजित सज्जन, अमरजीत सोही, नवदीप बेंस, बर्दिश छागर यांचा समावेश आहे. सोही यांनी नुकतेच आपण खलिस्तान आंदोलनाच्या विरोधात आहोत ना समर्थनात आहोत असे वक्तव्य केले होते.

त्रुडो यांनी कॅनडामधील खालसा डे परेडमध्येही भाग घेतला होता. यामध्ये खलिस्तान समर्थकांचा सहभागी असल्याचे वृत्त होते. त्रुडो यांनी या कार्यक्रमात जाऊ नये, असे भारताला वाटत होते.

- Advertisement -