संसद, राष्ट्रपती भवन, कुतूब मिनार, लाल किल्लाही गुलामीची निशाणी, मिटवून टाका – आझम खान

- Advertisement -

नवी दिल्ली – भाजपा आमदार संगीत सोम यांनी ताजमहालसंबंधी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सुरु झालेला वाद वाढू लागला असल्याचं दिसत आहे. असदुद्दीन ओवेसी यांच्यानंतर आता समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना, फक्त ताजमहालच का….संसद, राष्ट्रपती भवन, कुतूब मिनार, लाल किल्लादेखील गुलामीची निशाणी आहेत, त्या मिटवून टाका असं म्हटलं आहे.

‘गुलामीच्या सर्व निशाण्या मिटवल्या पाहिजेत हे मी सुरुवातीपासूनच सांगत आलो आहे. फक्त ताजमहालच कशासाठी ? संसद, राष्ट्रपती भवन, कुतूब मिनार, लाल किल्ला का नाही ? या सगळ्याही गुलामीच्या निशाणी आहेत. जर या देशद्रोहींना बांधल्या आहेत तर मग त्यांना मिटवून टाकलं पाहिजे’, असं आझम खान बोलले आहेत.

भाजपाचे आमदार संगीत सोम यांनी ताजमहालच्या इतिहासावर प्रश्नचिन्ह निर्माण करत नव्या वादाला तोंड फोडले. ते म्हणाले की, ज्या सम्राटाने आपल्या वडिलांना तुरुंगात बंद केले होते आणि हिंदुंना लक्ष्य केले होते त्या सम्राटाने हा ताजमहाल उभारला आहे. त्यामुळे मुगल सम्राटांची नावे मिटविण्यासाठी इतिहास नव्याने लिहिण्यात येईल. इतिहास मात्र, नेमका याच्या उलट आहे. शाहजहां यांनी आपली पत्नी मुमताज यांच्या स्मरणार्थ ताजमहाल उभारला होता. शाहजहां यांचे पुत्र औरंगजेबाने त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या काळात शाहजहां यांना तुरुंगात बंद केले होते. पण आमदार सोम म्हणाले की, मुगल सम्राट बाबर, अकबर आणि औरंगजेब यांची नावे इतिहासातून हटविण्याचे काम सरकार करीत आहे. उत्तर प्रदेश सरकारने पर्यटन पुस्तकात ताजमहालचा समावेश केलेला नाही.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर सिसोली गावात ते म्हणाले की, महाराणा प्रताप आणि शिवाजी महाराज यांच्यासारख्या महापुरुषांबाबत शाळा, महाविद्यालयातून शिक्षण द्यायला हवे.

ताजमहाल यापुढे पाहायचा नाही का?
भाजपा आमदार संगीत सोम यांनी ताजमहालच्या इतिहासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंर एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांनी सवाल केला आहे की, ताजमहाल पाहण्यासाठी जाऊ नका, असे आवाहन सरकार पर्यटकांना करणार आहे काय?, असा सवाल केला आहे. भाजपाच्या म्हणण्यानुसार विश्वासघातकी असलेल्या लोकांनी लाल किल्लाही बनविला आहे. या ठिकाणी झेंडावंदन करणे मोदी बंद करणार आहेत का? असा प्रश्नही ओवैसी यांनी विचारला.

- Advertisement -