Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeदेशपंतप्रधान मोदी बँक घोटाळ्याबाबत 2 मिनिटंही बोलत नाही : राहुल गांधी

पंतप्रधान मोदी बँक घोटाळ्याबाबत 2 मिनिटंही बोलत नाही : राहुल गांधी

मुंबई: ‘विद्यार्थ्यांच्या परीक्षांवर तब्बल दोन तास बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २२ हजार कोटींच्या घोटाळ्याबाबत २ मिनिटंही बोलत नाहीत.’ अशा शब्दात राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. नीरव मोदी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय असल्यामुळे तेही अडचणीत आले आहेत.यामुळे विरोधकांकडून आता पंतप्रधान मोदींना उत्तर मागितले जात आहेत.

हिऱ्याचा व्यापारी नीरव मोदी याने बँकांना खोटे लेटर ऑफ अंडरटेकिंग देत कोट्यवधीचा गंडा घातल्याचं काही दिवसांपूर्वीच समोर आलं. त्यानंतर हा एक प्रचंड मोठा घोटाळाच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे विरोधकांनी याप्रकरणी मोदी सरकारवर प्रचंड टीका सुरु केली. मात्र, याबाबत पंतप्रधान मोदींनी अद्याप कोणतंही भाष्य केलेलं नाही. त्यामुळे आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटरवरुन पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

दरम्यान, पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि हिऱ्याचे व्यापारी नीरव मोदी सध्या देशात नाही तर परदेशात असल्याची माहिती समोर आली आहे. हिरे व्यापारी नीरव मोदी यांनी आपल्या मित्रांच्या सहाय्यानं पंजाब नॅशनल बँकेला हा गंडा घातल्याचा आरोप आहे.
पंजाब नॅशनल बँकेच्या काही अकांऊट्सद्वारे गैरव्यवहार झाल्याचं उघड झालं होतं. काही खातेदारांच्या संगनमतानं हे व्यवहार झाल्याचं बँकेच्या निदर्शनास आलं. इतर बॅंकांकडूनही परदेशात या ठराविक व्यक्तींच्या खात्यामध्ये पैसा पाठवण्यात आला होता. बॅंकेनी हा प्रकार उघड होताच रितसर तक्रार केली.

घोटाळा कसा झाला?
नीरव मोदी आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी आपल्या तीन कंपन्यांद्वारे हे षडयंत्र रचल्याचा आरोप आहे. तीन कंपन्यांच्या नावावर हाँगकाँगमधून सामान येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सामान मागवण्यासाठी लेटर ऑफ अंडरटेकिंगची मागणी बँकेकडे केली.
लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे मागवण्यात आलेल्या सामानाचे पैसे देण्याची जबाबदारी बँक घेत असल्याचं पत्र. हेच पत्र अलाहाबाद बँक आणि अॅक्सिस बँकेच्या हाँगकाँगमधल्या शाखांच्या नावावर काढण्याची मागणी केली. याद्वारे हाँगकाँगहून 280 कोटी रुपयांचं सामान मागवण्यात आलं.
पीएनबीने हाँगकाँगमधील अलाहाबाद बँकेला 5 आणि अॅक्सिस बँकेला 3 लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी केली आणि जवळपास 280 कोटी रुपयांचं सामान आणण्यात आलं. 18 जानेवारीला या तिन्ही कंपन्यांचे संबंधित अधिकारी पीएनबीच्या मुंबई शाखेत गेले आणि त्यांनी सामानाचे पैसे भरण्यास सांगितलं.
कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बँकेचं लेटर दाखवलं आणि पेमेंटची मागणी केली. जितके पैसे परदेशात पाठवायचे आहेत, तितकी कॅश भरायला  बँक अधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र बँकेने जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांची झोपच उडाली. कारण बँकेत एक रुपयाही न ठेवता या कंपन्यांनी लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी करायला लावल्याचं उघड झालं.
बँकेने तक्रार दाखल केली असून हे प्रकरण आता सीबीआयपर्यंत पोहोचलं आहे. नीरव मोदी यांना जारी केलेले आठही लेटर ऑफ अंडरटेकिंग बनावट असल्याचं उघड झालं. पीएनबीचे डेप्युटी मॅनेजर गोकुळनाथ शेट्टी यांनी एका कर्मचाऱ्याला हाताशी घेऊन हे लेटर जारी केल्याची माहिती आहे. त्यामुळे आता 280 कोटी रुपये पीएनबीला चुकते करावे लागणार आहेत.

पीएनबी देशातली दुसरी मोठी बँक

122 वर्ष जुनी पीएनबी देशातली सर्वात मोठी दुसरी बँक आहे. पीएनबीचे एकूण 10 कोटी खातेधारक आहेत. तर देशात बँकेच्या एकूण 6941 शाखा, 9753 एटीएम सेंटर आहेत. पीएनबीचा 2017 या वर्षातील निव्वळ नफा 904 कोटी रुपयांचा आहे आणि एकूण एनपीए 57 हजार 630 कोटी रुपये आहे. देशातून फरार असलेल्या उद्योगपती विजय मल्ल्याकडे पीएनबीचं 815 कोटींचं कर्ज आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानंतर पीएनबी देशातली सर्वात मोठी दुसरी बँक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments