Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशराजस्थान सरकारचा फतवा: तरुणींना जीन्स, टी-शर्ट घालण्यास बंदी!

राजस्थान सरकारचा फतवा: तरुणींना जीन्स, टी-शर्ट घालण्यास बंदी!

jeans-t-shirt banजयपूर: संपूर्ण जगात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात येत असतानाच राजस्थानात मात्र महाविद्यालयीन तरुणींना मनपसंत कपडे घालण्यास मनाई करण्यात आली आहे. राजस्थान सरकारने एक फतवा काढून कॉलेजात जाणाऱ्या १ लाख ८६ हजार तरुणींना जीन्स पँट आणि टी-शर्ट घालण्यास बंदी केली असून राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

शैक्षणिक वर्ष २०१८-२०१९ पासून हा ड्रेस कोड लागू करण्यात आला असून त्याचं पालन करणं सर्व महाविद्यालयांना बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र राजस्थानच्या शिक्षण विभागाने ड्रेसचा रंग ठरविण्याचा अधिकार संबंधित कॉलेजांना दिला आहे. शिवाय विद्यार्थी आणि विद्यार्थीनींच्या ड्रेसचा रंग वेगवेगळा ठेवण्याचं बंधनही कॉलेजांना घालण्यात आलं आहे.
साधारणपणे इयत्ता १२ वी पर्यंत विद्यार्थ्यांना ड्रेस कोड असतो. १२ वी नंतर महाविद्यालयांमध्ये त्यांना मनपसंत ड्रेस परिधान करता येतो. मात्र राजस्थान सरकारच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आता महाविद्यालयातही ड्रेस कोडचं पालन करावं लागणार आहे. सरकारच्या या निर्णयावर राज्यभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

सलवार-कुर्ता आणि साडी

दरम्यान, महाविद्यालयांमध्ये सलवार-कुर्ता किंवा साडी परिधान करून येण्याचं बंधन राजस्थान सरकारने घातलं आहे. म्हणजेच कॉलेजात जीन्स आणि टी-शर्ट घालून येण्यास विद्यार्थिनींना बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे सरकारने घालून दिलेला ड्रेस कोड पाळला नाही तर विद्यार्थ्यांना कॉलेजात प्रवेश देण्यात येणार नसल्याचंही सरकारने स्पष्ट केलं आहे.

म्हणून ड्रेस कोड
कारण नसताना अनेक माजी विद्यार्थी कॉलेजात येत असतात. त्यामुळे कॉलेजातील वातावरण खराब होते. त्यामुळे कॉलेजच्या नियमांचा भंग होतो. विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतरच ही माहिती मिळाली. त्यामुळे ड्रेस कोड लागू करण्यात येत असल्याचा दावा उच्च शिक्षण मंत्री किरण महेश्वरी यांनी केला आहे. दरम्यान, ड्रेसचा रंग भगवा ठेवण्याची सक्ती केल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला. मात्र एखाद्या कॉलेजने भगव्या रंगाचा ड्रेस कोड ठरविला तर त्याला सरकारचा विरोध असणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments