देशभरात ‘पद्मावत’च्या प्रदर्शनासाठी सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

- Advertisement -

नवी दिल्ली – गेले अनेक दिवस वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ‘पद्मावत’ या सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आता देशातील सर्वच राज्यांमध्ये सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे या सिनेमाच्या निर्मात्यांना दिलासा मिळाला आहे. ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी या संदर्भात निर्मात्यांची बाजू मांडली.

पद्मावत सिनेमातील असलेल्या आक्षेपार्ह दृष्यांच्या पार्श्वभूमीवर करणी सेना तसेच इतर संघटनांनी या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली होती. या वादातून सिनेमाचे नाव बदलून ‘पद्मावती’ वरून ‘पद्मावत’ करण्यात आले. तरीही या सिनेमाला होणारा विरोध काही थांबला नव्हता. अशातच आता सर्वोच्च न्यायालयाने या सिनेमाच्या देशभरातील प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला आहे.
सेन्सॉर बोर्डाने या सिनेमाच्या प्रदर्शनाला परवानगी दिल्यानंतरही राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा या राज्यांमध्ये ‘पद्मावत’च्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती. त्याविरोधात या सिनेमाच्या निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीनंतर सिनेमाच्या सर्व निर्मात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, हा सिनेमा येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -
- Advertisement -