नितीशकुमारांच्या प्रेरणेने प्राध्यपाकाने हुंडा केला परत

- Advertisement -

बिहार: बिहारमधील एका माजी मुख्याध्यापकाने आपल्या मुलाच्या लग्नासाठी वधूच्या कुटुंबीयांकडून स्वीकारलेली हुंड्याची ४ लाख रुपयांची रक्कम परत केली आहे. त्यांच्या या कृतीचे कौतुक होत असले तरी, यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे हुंडाविरोधी काम आपल्यासाठी प्रेरणादायी ठरल्याचे या व्यक्तीने म्हटले आहे.

हरिंदर सिंह असे या मुख्याध्यापकांचे नाव असून ते जगदीशपूर ब्लॉक येथील कौरा गावातील आदर्श मिडल स्कूलमध्ये मुख्याध्यापक होते. येत्या ३ डिसेंबर रोजी त्यांच्या धाकट्या मुलाचे लग्न आहे. त्याचे इलेक्ट्रिक वस्तू विक्रीचे दुकान आहे. या लग्नासाठी त्यांनी वधूच्या कुटुंबीयांकडून ४ लाख रुपयांचा हुंडा घेतला होता. मात्र, त्यांच्या अरा जिल्ह्यात ४ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या दौऱ्यात हुंड्याविरोधात आणि बाल विवाहाविरोधात भाषण केले होते. त्यांच्या या मोहिमेने प्रेरणा घेऊन आपल्या मुलाच्या लग्नातही हुंडा घेणार नाही अशी भुमिका त्यांनी घेतली.

- Advertisement -

याप्रकरणी वधूचा भाऊ रोहित सिंह याने प्रतिक्रिया देताना सांगितले की, मुलाच्या कुटुंबीयांच्या या निर्णयामुळे आम्ही सुरुवातीला गोंधळलो होतो. आम्हाला वाटले होते की, मुलाच्या कुटुंबीयांनी पैसे परत केले म्हणजे ते लग्न मोडताहेत की काय? मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे उच्च नैतिक मुल्ये असणाऱ्या कुटुंबात माझ्या बहिणीचे लग्न होत असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो आहे. भोजपूरचे पोलिस अधीक्षक आकाशकुमार यांनी याप्रकरणी कुठलीही तक्रार आमच्याकडे आलेली नसल्याचे सांगितले. मात्र, याबाबत सामाजिक प्रबोधन होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

भारतीय दंड विधानानुसार, हुंडा स्वीकारणे हा गुन्हा आहे. त्यासाठी कडक शिक्षा किंवा ७ वर्षांसाठी तुरुंगवास होऊ शकतो. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या माहितीनुसार, २०१५ मध्ये बिहारमध्ये १,१५४ मृत्यू हे हुंडाबळीमुळे झालेले आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो.

- Advertisement -