योगी आदित्यनाथांच्या रॅलीत मुस्लिम महिलेला काढायला लावला बुरखा!

- Advertisement -

महत्वाचे…
१.मुस्लिम महिलेला पोलीसांनी जबरदस्तीने बुरखा काढायला लावला २. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या रॅलीतील प्रकार ३. पोलीस महासंचालक अनिल कुमार यांची उडवाउडवीची उत्तरे


बलिया – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या रॅलीतील एक व्हिडीओ समोर आला असून व्हायरल होत आहे. या व्हिडीओत योगी आदित्यनाथ यांच्या रॅलीसाठी उपस्थित मुस्लिम महिलेला पोलीस जबरदस्तीने बुरखा काढायला लावत असल्याचं दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांवर टीका होऊ लागली आहे. उत्तर प्रदेशातील बलिया येथे ही रॅली पार पडली होती. 

योगी आदित्यनाथ यांच्या रॅलीसाठी सायरा नावाची एक मुस्लिम महिला उपस्थित होती. सायरा यांनी बुरखा घातला असल्याने पोलीस त्यांच्याकडे गेले आणि बुरखा काढण्याची सूचना केली. यानंतर सायरा यांनी आपला चेहरा दाखवला आणि नंतर साडीचा पदर डोक्यावर घेतला. पण नंतर पोलिसांनी त्यांना पुर्ण बुरखाच काढायला लावला.

- Advertisement -

अशाप्रकारे सायरा यांना सर्व लोकांसमोर रॅलीत बुरखा काढायला लावला. नंतर पोलिसांनी बुरखा जप्त करुन घेतला. रॅलीसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सोबतच गुप्तचर यंत्रणांचीही मदत घेतली गेली होती. यामुळे काळा जॅकेट, काळा स्वेटर आणि काळा कोट घातलेल्या व्यक्तींना रॅलीत येण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. याप्रकरणी पोलीस महासंचालक अनिल कुमार यांनी सांगितलं आहे की, ‘मला अशा प्रकारची कोणतीही घटना घडल्याची माहिती नव्हती. आम्ही चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. कोणीही योगी आदित्यनाथ यांना काळा कपडा दाखवू नये याची काळजी घेण्यात आली होती. याप्रकरणी तपास केल्यानंतर कारवाई केली जाईल’अशी उडवाडवीचे उत्तरे दिली.

- Advertisement -