Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमराठवाडाफिर एक बार मोदी सरकारचा बुथ प्रतिनिधींकडून निर्धार शहर मतदारसंघात अटल संमेलनाच्या...

फिर एक बार मोदी सरकारचा बुथ प्रतिनिधींकडून निर्धार शहर मतदारसंघात अटल संमेलनाच्या माध्यमातून भाजपाच्या प्रचाराला गती

लातूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत पाच वर्षात केंद्र सरकारच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकांसाठी विकासाच्या योजना पोहोचवून समतोल विकास साधलेला आहे. त्याचबरोबर देशहितासह देश सुरक्षिततेसाठी नियोजनबध्द यंत्रणा राबवून त्याची कडक पध्दतीने अंमलबजावणी केलेली आहे. त्यामुळेच देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला प्रत्येकाची पसंती मिळत असून आगामी लोकसभा निवडणुकीत फिर एक बार मोदी सरकार निवडून आणायचेच असा निर्धार शहर मतदारसंघातील बुथ प्रतिनिधींनी केलेला आहे.

लातूर शहर मतदारसंघाअंतर्गत शनिवार दि. 30 मार्च रोजीपासून अटल बुथ संमेलन घेण्यास सुरूवात केलेली आहे. या संमेलनात भाजपाचे लोकसभा प्रभारी अ‍ॅड. मिलींद पाटील, शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे, शहर विस्तारक डांगे, मोहन माने आदींची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील प्रभाग क्रमांक 6, 3, 8, 9,15 या परिसरातील मंडल अध्यक्षांसह पदाधिकारी, कार्यकर्ते व बुथ प्रमुखांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

या संमेलनास मार्गदर्शन करताना प्रभारी अ‍ॅड. मिलींद पाटील यांनी सबका साथ.. सबका विकासचा नारा देणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत पाच वर्षात समाजातील प्रत्येक घटकांसाठी विकासाच्या योजना राबवत त्यांना विकासाच्याा प्रवाहात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आघाडी सरकारच्या कार्यकाळात केवळ घोषणा होवून त्याची अंमलबजावणी होत नव्हती. तसेच झालेल्या घोषणांचा लाभ अनेक घटकांना मिळत नव्हता. मात्र पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने विकास योजनांचा लाभ थेट जनतेला मिळावा याकरीता दलाली पध्दत बंद करून लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करीत पारदर्शक कारभार केला असल्याचे अ‍ॅड. पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच देशहित व सुरक्षितता याला प्राधान्य देवून याकरीता कडक निर्णयांची अंमलबजावणी केलेली आहे. त्यामुळे आज जागतिक स्तरावर भारताचा दबदबा वाढवून भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करू लागलेला आहे. आगामी काळात देशाला वैभवाच्या शिखरावर नेवून ठेवण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारलाच संधी देण्यासाठी बुथ प्रमुखांसह कार्यकर्त्यांनी योगदान द्यावे असे आवाहन केले.

यावेळी शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने लातूर शहराच्या विकासासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून कोट्यवधी रूपयांचा निधी मंजूर केला असल्याचे सांगून यापूर्वी शहराच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी कधीच प्राप्त झाला नव्हता, असे सांगितले. या निधीच्या माध्यमातून विकासाचा नवीन लातूर पॅटर्न निर्माण होईल असा विश्‍वास व्यक्त करून या पॅटर्नला अधिक झळाळी मिळण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत शक्ती केंद्र, बुथ प्रमुखांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपाचा विचार व केलेले काम घराघरात पोहोचवावे असे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम असल्याचे आता सिध्द झालेले असून या नेतृत्वाचा गौरव वाढविण्यासाठी फिर एक बार मोदी सरकार हा नारा खरा करून दाखवत लातूर लोकसभेचा उमेदवार विक्रमी मताधिक्क्यांनी विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments