दुबळ्या बांगलादेशचा भारताकडून धुव्वा

- Advertisement -

आशिया चषक हॉकी स्पर्धेत आपला दुसरा सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने दुबळ्या बांगलादेशचा ७-० असा धुव्वा उडवला. संपूर्ण सामन्यात भारताने आपलं वर्चस्व कायम राखलं होतं, त्यामुळे यजमान बांगलादेशला सामन्यात डोकं वर काढण्याची संधीच मिळाली नाही. बांगालदेशच्या दुबळ्या खेळाचा फायदा घेत मग भारतीय खेळाडूंनीही सामन्यात चांगला सराव करत गोलची बरसात केली.

गुरजंत सिंहने ७ व्या मिनीटाला भारताचं खातं उघडत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. यापाठोपाठ आकाशदीप सिंहने १० व्या तर ललित उपाध्यायने १३ व्या मिनीटाला गोल झळकावत भारताची आघाडी ३-० अशी केली. या संपूर्ण सामन्यात बांगलादेशने एकदाही भारताचा प्रतिकार केला नाही, त्यामुळे सामन्यावर वर्चस्व राखणं भारतीय संघाला सोपं गेलं.

दुसऱ्या सत्रात घरच्या मैदानावर खेळणारा बांगालदेशचा संघ भारताला काहीसा प्रतिकार करेल अशी सर्वांना आशा होती. मात्र भारतीय खेळाडूंनी ही आशाही फोल ठरवली. अमित रोहीदास, हरमनप्रीत सिंह आणि रमणदीप सिंह यांनी दुसऱ्या सत्रात पुन्हा गोलचा धडाका लावत भारतीय संघाची आघाडी ७-० अशी केली. भारताच्या या आक्रमक खेळीचं उत्तर बांगलादेशकडे नव्हतं, त्यामुळे हा सामना कमालीचा एकतर्फी झालेला पहायला मिळाला.

- Advertisement -
- Advertisement -