धोनी दुबईतून सुरु करतोय क्रिकेटचा नवा अध्याय !

- Advertisement -

मुंबई: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी दुबईमध्ये जागतिक स्तरावरील क्रिकेट अॅकॅडमी सुरु करत आहे.’ द महेंद्रसिंह धोनी क्रिकेट अॅकडमी या नावाने क्रिकेटच्या नव्या इंनिंगला तो सुरुवात करतोय. शनिवारी या अॅकॅडमीचे धोनी स्वत: उद्घाटन करणार आहे. त्यानंतर रविवारी तो याच ठिकाणी नवोदीत क्रिकेटर्ससोबत एक विशेष चर्चा सत्रात सहभाग होणार आहे. क्रिकेटच्या मैदानात यशाच शिखर गाठल्यानंतर क्रिकेट अॅकॅडमीसोबत तो क्रिकेटचा आणखी एक अध्याय सुरु करतोय.

दुबईतील स्पिंगडेल्स स्कुल कॅम्पसच्या परिसरात क्रिकेट अॅकॅडमी सुरु करण्यासाठी धोनीच्या कंपनीने दुबईतील पॅसिफीक वेंचर्स या कंपनीसोबत करार केलाय. धोनी या संकल्पनेचा अधिक विस्तार करण्याचा विचार करत असल्याची चर्चा देखील क्रिकेट वर्तुळात रंगली होती. त्याचसोबत खुद्द धोनी या माध्यमातून नवोदितांना मार्गदर्शन करण्याचे कार्य हाती घेण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. पॅसिफिक वेंचर्स कंपनीचे संचालक परवेझ खानने धोनीच्या नावाने सुरु होणारी अॅकॅडमी अद्यावत असल्याचे स्टार स्पोर्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले. ते म्हणाले की, धोनीसारख्या खेळाडूची दुबईमध्ये अॅकडमी असणे भाग्यशाली गोष्ट आहे. या अॅकॅडमीच्या विस्ताराबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या देशात अॅकडमी सुरु करण्याबाबत विचार करत असल्याचे परवेझ यावेळी म्हणाले.
नुकतेच भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी खिशात घातली. या मालिकेतील दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने भारतावर ४० धावांनी मात केली होती. पराभवानंतर महेंद्रसिंह धोनीच्या संघातील जागेवरुन पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले.१० व्या षटकानंतर धोनीने मैदानात स्थिर होण्यासाठी अधिक वेळ घेतला. आगामी काळात महेंद्रसिंह धोनीने टी-२० क्रिकेटमध्ये इतर खेळाडूंना संधी द्यायला हरकत नाही, असं मत भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण याने व्यक्त केलं. टी-२० साठी भारतीय संघाला धोनीसाठी पर्याय शोधणं गरजेचं असल्याचं म्हणत लक्ष्मणने वन-डे सामन्यासाठी धोनी अजूनही योग्य खेळाडू असल्याचं म्हटलं होतं.

- Advertisement -