हातात पोस्टर घेऊन भारतीय चाहत्यांनी मागितली ऑस्ट्रेलियन खेळाडूंची माफी,

- Advertisement -

गुवाहाटी – भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना गुवाहाटी येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाचा आठ विकेट्सने पराभव केल्यानंतर हॉटेलवर परतणा-या ऑस्ट्रेलिया संघाच्या बसवर दगडफेक करण्यात आली. या घटनेचा निषेध करत काही भारतीय चाहत्यांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंची माफी मागितली आहे.

गुवाहाटीत ऑस्ट्रेलियन खेळाडू ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्या रेडिसन ब्ल्यू हॉटेलबाहेर काही भारतीय चाहत्यांनी हातात पोस्टर घेऊन सॉरी म्हणत खेळाडूंची माफी मागितली. भारतीय चाहत्यांनी अशाप्रकारे माफी मागणं एक चांगला प्रयत्न असून, त्यांचं कौतुक केलं जात आहे.

भारताविरुद्ध दुस-या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात विजय मिळवणा-या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या बसवर मंगळवारी रात्री दगड फेकण्यात आला होता. त्यामुळे पाहुण्या संघातील खेळाडूंमध्ये भीतीचे वातावरण होते.

- Advertisement -

पोलिसांनी या प्रकरणात दोन संशयितांना अटक केली आहे. या हल्ल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाच्या बसच्या खिडकीचे तावदान तुटले. पाहुण्या संघाने भारताविरुद्ध दुस-या टी-२० सामन्यात आठ गडी राखून विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधल्यानंतर ही घटना घडली. घटनेत सुदैवाने कुणा खेळाडूला दुखापत झाली नाही. कारण खिडकीजवळच्या आसनावर कुणी बसलेले नव्हते. पण, या घटनेमुळे आसाम क्रिकेट संघटना आणि बारसपारामध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यासाठी राज्य पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

- Advertisement -