आशिष नेहराच्या निरोपाच्या सामन्यापूर्वी विराटसमोर उभा राहिला हा सवाल

- Advertisement -

नवी दिल्ली – भारताचा डावखुरा जलदगती गोलंदाज आशिष नेहराचा शेवटचा सामना असल्याने भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज संध्याकाळी होणाऱ्या पहिल्या टी-20 लढतीला विशेष महत्त्व आले आहे. या सामन्यात न्यूझीलंडवर मात करून नेहराला विजयी निरोप देण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. मात्र शेवटच्या सामन्यात नेहराला संघात स्थान देण्यासाठी कुणाला वगळायचे हा मोठा प्रश्न कर्णधार विराट कोहलीसमोर आहे.
गेल्या काही वर्षांपासून आशिष नेहराने टी-20 संघात स्थान कायम राखले असले तरी त्याला नियमितपणे संधी देण्यात येत नव्हती. त्यातच भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा हे वेगवान गोलंदाज आणि कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल हे फिरकीपटू चांगली कामगिरी करत असल्याने नेहराला संधी देण्यासाठी या चौघांपैकी कुणाला तरी संघाबाहेर ठेवावे लागेल. किंवा या चारही फलंदाजांना संघात कायम ठेवत हार्दिक पांड्याला वगळण्याचा कटू निर्णय घ्यावा लागेल. मात्र अष्टपैलू हार्दिक पांड्याची उपयुक्तता लक्षात घेता त्याला वगळण्याचा धोका कोहली पत्करणार नाही.
गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या ट्वेंटी-20 मालिकेत आशिष नेहराला भारतीय संघात असूनही अंतिम संघात स्थान देण्यात आले  नव्हते. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघात स्थान मिळताच नेहराने निवृत्तीची घोषणा केली होती. त्यातच हा सामना नेहराचे घरचे मैदान असलेल्या फिरोझशाह कोटलावर होणार असल्याने या सामन्याला विशेष भावनिक महत्त्व आले आहे.

आशिष नेहराने अखेरचा कसोटी सामना एप्रिल २००४मध्ये, तर अखेरचा वन-डे विश्वकप २०११मध्ये खेळला होता.पण तो आयपीएल व अन्य स्पर्धांमध्ये नियमितपणे खेळतो. टी-२० क्रिकेटमध्ये तो भारतीय संघाचे प्रतिनिधित्वही करतो.

विराट कोहली अ‍ॅन्ड कंपनी या लढतीच्या निमित्ताने अनेक बाबी साध्य करण्यास प्रयत्नशील आहे. प्रत्येक क्रिकेटपटू आपल्या सहका-याला विजयाने निरोप देण्यास उत्सुक असतो आणि सध्याचा संघ नेहराला हा सन्मान देण्यास प्रयत्नशील आहे. भारताने या लढतीत विजय मिळवला तर न्यूझीलंडविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये हा पहिला विजय ठरेल. त्यामुळे भारत पराभवाचे दुष्टचक्र भेदण्यात यशस्वी ठरण्यासोबत अखेरच्या दोन वन-डेमध्ये मिळवलेल्या विजयाची लयही कायम राखेल.

- Advertisement -

भारताने न्यूझीलंडविरुद्ध जे पाच टी-२० सामने खेळले आहेत त्यात प्रत्येक वेळी भारताला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यात गेल्या वर्षी विश्व टी-२० चॅम्पियनशिपमध्ये नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या लढतीचाही समावेश आहे. त्या वेळी भारतीय संघ ७९ धावांत गारद झाला होता.

- Advertisement -