कुंबळेंना ‘बर्थ डे’ शुभेच्छा देतांना बीसीसीआयकडून कंजुषी

- Advertisement -

मुंबई – भारताचे महान क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांना टि्वटरवरुन बर्थ डे च्या शुभेच्छा देताना बीसीसीआयने शब्दांची कंजुषी केली. एक प्रकारे वाढदिवसाच्या दिवशीच बीसीसीआयने कुंबळेंचा अपमान केला. त्या मुद्यावरुन क्रिकेट चाहत्यांनी बीसीसीआयला चांगलेच फटकारले. चाहत्यांचा रोष लक्षात आल्यानंतर बीसीआयने लगेच आपले टि्वट डिलीट केले आणि नव्याने टि्वट केले. अनिल कुंबळे यांनी आज वयाच्या ४७ व्या वर्षात पदार्पण केले.

बीसीसीआयने अनिल कुंबळेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांचा ‘माजी गोलंदाज’ एवढाच उल्लेख केला होता. बीसीसीआयचे हे टि्वट कुंबळेंच्या चाहत्यांना अजिबात पटले नाही.  त्यांनी यावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या. बीसीसीआयने अनिल कुंबळेंच्या भारतीय क्रिकेटमधील योगदानाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांच्या चाहत्यांनी केला. कुंबळे फक्त गोलंदाज होते का ? भारताचे कर्णधार, प्रशिक्षक, भारतातर्फे सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज नव्हते का ? असा प्रश्न पत्रकार आणि लेखक दिग्विजय सिंह यांनी टि्वटरवर विचारला.

अन्य चाहत्यांनी बीसीसीआयला कुंबळे यांना योग्य तो मान देण्याची विनंती केली. त्यानंतर बीसीसीआयने जुने टि्वट डिलीट केले व नव्या टि्वटमध्ये कुंबळेंना बर्थ डे च्या शुभेच्छा देताना माजी कर्णधार, महान खेळाडू या शब्दांचा समावेश केला. अनिल कुंबळे यांनी यावर्षीच जून महिन्यात कर्णधार विराट कोहलीबरोबर तीव्र मतभेद झाल्यानंतर प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता.

- Advertisement -

त्यावेळी सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांनी विराट कोहलीला खडे बोल सुनावताना अनिल कुंबळ यांचे समर्थन केले होते. भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावसकरसह अनेकांनी अनिल कुंबळेंचे समर्थन केले होते. अनिल कुंबळे यांनी 17 वर्ष भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधीत्व केले. विराट कोहलीबरोबर झालेल्या वादावर अद्यापपर्यंत त्यांनी कोणतेही जाहीर मतप्रदर्शन केलेले नाही. अनिल कुंबळे यांची जागा आता रवी शास्त्री यांनी घेतली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारतातर्फे सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. 132 कसोटीमध्ये त्यांनी 619 विकेट घेतल्या.

- Advertisement -