कन्नड दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांना ‘झेनिथ एशिया’ पुरस्कार

- Advertisement -

पुणे : आठव्या आशियाई चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ कन्नड दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांना झेनिथ एशियापुरस्कार जाहीर झाला आहे. तर भारतीय चित्रपटांमध्ये स्वत: चा वेगळा ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जीवनगौरवपुरस्कार दिला जाणार आहे. तब्बल सहा वर्षांनंतर आशय फिल्म क्लब आयोजित आठव्या आशियाई चित्रपट महोत्सवाला २४ जानेवारीपासून सुरुवात होत आहे.

या महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांच्या हस्ते सायंकाळी ६ वाजता होणार आहे. त्यापूर्वी मोहम्मद रहनामीयन दिग्दर्शित ‘बेंच सिनेमा’ हा इराणी चित्रपट उद्घाटनाचा चित्रपट म्हणून दाखविण्यात येणार आहे. या उद्घाटन सोहळ्यातच गिरीश कासारवल्ली यांना ‘झेनिथ एशिया’ पुरस्कार दिला जाणार आहे.
दि. ३० जानेवारी रोजी महोत्सवाचा समारोप ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या उपस्थितीत होणार असून, यावेळी दिलीप प्रभावळकर यांना जीवनगौरव पुरस्कार दिला जाईल. राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘कासव’ चित्रपटाने महोत्सवाचा समारोप होईल.

- Advertisement -