काँग्रेस पक्षाच्या आमदारांची समिती ७ ऑक्टोबर रोजी यवतमाळ जिल्हा दौरा

आ. विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय आमदारांची समिती

- Advertisement -

राज्यात एकीकडे शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरु असतानाच, आता विषबाधेच्या घटनेने संपुर्ण महाराष्ट्र हादरला आहे. कपाशी वरील कीड आटोक्यात आणताना विषबाधा होऊन एकट्या यवतमाळ जिल्ह्यात २२ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर  ७५० हून अधिक शेतकरी अत्यावस्थ आहे. तसेच बुलडाणा जिल्ह्यात विषबाधेने ११ जणांचा तर अकोला सामान्य रूग्णालयात ८ जणांचा मृत्यू झाला असून दररोज ३० ते ३५ नवीन रुग्ण दवाखान्यात दाखल होत आहेत. या विषबाधेच्या घटनेमुळे २५ हून अधिक शेतकऱ्यांना कायमचे अंधत्व व मेंदूवर विपरित परिणाम झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

या सर्व परिस्थितीची पाहणी करण्यासाठी तसेच बाधित शेतकरी कुटूंबियांची भेट घेऊन वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी काँग्रेस पक्षाचे विधानसभेतील उप गटनेते आ.विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाने पाच सदस्यीय आमदारांची एक समिती गठीत केली आहे. ही समिती विर्दभातील विषबाधित जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. या समितीमध्ये आ.विरेंद्र जगताप, आ.राहूल बोंद्रे, आ, यशोमती ठाकूर, आ.अमित झनक हे सदस्य आहेत.

- Advertisement -

ही समिती शनिवार दि. ७  ऑक्टोबर रोजी यवतमाळ व त्यानंतर उर्वरित जिल्ह्याचा दौरा करणार असून बाधित गावात जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करणार आहेत. या विषबाधेच्या घटनेचा व परिणामांचा अभ्यास करुन विधिमंडळाच्या आगामी  हिवाळी अधिवेशनात या बाधित कुटूंबांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारला धारेवर धरण्याचे काम करणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड.गणेश पाटील यांनी दिली आहे.

- Advertisement -