हॉकर्स झोनची नवीन यादी तयार करण्याचे महापौरांचे प्रशासनाला आदेश

- Advertisement -

मुंबई – हॉकर्स झोन यादी ट्वीटरवरुन जाहीर केली जाते. यादी तयार करताना नगरसेवकांना विचारात घेतले नाही. त्यामुळे ही यादी रद्द करा व नवीन यादीत महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, गटनेते यांना सहभागी करा अशी जोरदार मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी लावून धरली. त्यानंतर ही यादी रद्द करून नगरसेवकांना विचारात घेऊन नवीन यादी तयार करावी असे निर्देश महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी प्रशासनाला दिले.

फेरीवाल्यांसाठी ८५ हजार ८९१ जागा पालिकेने निश्चित करुन त्यांची यादी संकेतस्थळावर सूचना, हरकतीसाठी जाहिर केली आहे. पालिका उपायुक्त निधी चौधरी यांनी ही यादी ट्वीटरवरून जाहिर केली. मात्र नगरसेवकांना या यादीबाबत काहीच माहिती नाही. नगरसेवकांना विचारात न घेता ही यादी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे ही प्रस्तावित यादी रद्द करावी अशी मागणी भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी सभागृहात केली.
या मागणीला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठींबा देऊन प्रशासनाला धारेवर धरले. नगरसेवक निधीतून नगरसेवक वॉर्डमध्ये फूटपाथ तयार करतात. मात्र त्यावर फेरीवाल्यांना बसवताना नगरसेवकांना विचारात घेतले जात नाही. स्वतःच्या इमेजसाठी प्रशासन नगरसेवकांना विचारात घेत नाही, असा आरोप करत उपायुक्त निधी चौधरी यांना परत पाठवा अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली.
नवीन यादी नगरसेवकांना विचारात घेतल्याशिवाय तयार करू नय़े. या यादीत महापौर, स्थायी समिती अध्यक्ष व गटनेत्यांना सहभागी करावे. तोपर्यंत हा प्रस्ताव तहकूब करावा अशी मागणी सभागृह नेते यशवंत जाधव यांनी केली. त्यानंतर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीही तसे निर्देश प्रशासनाला दिले. त्यामुळे फेरीवाल्यांवरून राजकारण पेटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -