Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रवाहतूक पोलिस मारहाण: आ. बच्चू कडूंना जामीन मंजूर!

वाहतूक पोलिस मारहाण: आ. बच्चू कडूंना जामीन मंजूर!

परतवाडा (अमरावती) : वाहतूक पोलीस शिपायाला शिवीगाळ, मारहाण आणि सरकारी कामात अडथळा केल्याच्या आरोपावरून बुधवारी दुपारी १२ वाजता अचलपूर येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी डी.बी. पतंगे यांच्या न्यायालयाने अपक्ष आमदार बच्चू कडूंसह चौघांना प्रत्येकी सहा महिने शिक्षा व १२०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. शिक्षेच्या सुनावणीनंतर बच्चू कडूंसह चौघांना प्रत्येकी सात हजार रुपयांच्या मुचलक्यावर जामीन मिळाला. 

परतवाडा येथे २३ एप्रिल २०१६ रोजी बसस्थानक परिसरात तैनात वाहतूक पोलीस शिपाई इंद्रजित चौधरी यांच्याशी याच परिसरातून जात असलेले आ. बच्चू कडू (४५, रा. बेलोरा), मंगेश बबनराव देशमुख (४५, रा. वणी बेलखेडा), अंकुश जनार्दन जवंजाळ (२७, रा. ब्राम्हणवाडा कॉलनी, परतवाडा) व धीरज काशीनाथ निकम (४१, रा. सर्फापूर कल्होडी, ह.मु. देवमाळी) यांनी वाहतूक व्यवस्थेवरून वाद घालीत शिवीगाळ, मारहाण व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची फिर्याद परतवाडा पोलिसांत दाखल झाली होती. त्यावरून पोलिसांनी भादंविच्या कलम ३५३, ३३२, २९४, १८६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. ठाणेदार किरण वानखडे यांनी तपास केला.

अचलपूर येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी डी.बी. पतंगे यांच्या न्यायालयापुढे बुधवारी या प्रकरणावर निकाल देण्यात आला. आमदारांसह चौघांना भादंविच्या ३५३ कलम अन्वये प्रत्येकी सहा महिने व एक हजार रुपये रोख, तर भादंविच्या १८६ कलम अन्वये प्रत्येकी एक महिना शिक्षा व दोनशे रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे सरकारी अधिवक्ता मंजूषा सावरकर, अनिल धवस, तर आ. कडू यांच्यातर्फे महेश देशमुख यांनी बाजू मांडली. पैरवी अधिकारी पुरुषोत्तम यावले होते. न्यायालयाने शिक्षा सुनावताच आ. बच्चू कडू व सहकाºयांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. प्रत्येकी सात हजारांच्या मुचलक्यावर चौघांचा जामीन मंजूर करण्यात आला. भादंविचे ३५३ व १८६ हे कलम भ्रष्ट अधिका-यांसाठी कवच झाले आहे. याविरोधात आमदारांना एकत्र करण्याचा प्रयत्न करून विधानसभेत हा मुद्दा मांडणार असल्याचे यावेळी बच्चू यांनी जाहीर केले.
आ. बच्चू कडू यांच्यासह अंकुश जवंजाळ, मंगेश देशमुख, धीरज निकम यांना न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर अमरावती येथे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्रपरिषद बोलावली होती. आजपर्यंत अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा मिळाली आहे; मग आताच पत्रपरिषद का घेतली, असा सवाल पत्रकारांनी अधीक्षकांच्यावतीने उपस्थित असलेले अपर पोलीस अधीक्षक एम.एम. मकानदार यांना  केला. हे प्रकरण वाहतूक पोलीस कर्मचा-याशी संबंधित आहे. अशाप्रकारे शिक्षा क्वचितच ठोठावली जाते. त्या दृष्टीने ही पत्रपरिषद आयोजित केल्याचे मकानदार यांनी पत्रकारांना सांगितले. यावेळी परतवाड्याचे तत्कालीन ठाणेदार किरण वानखडे उपस्थित होते.

राहुटीत परतले आमदार कडू-
जामिनावर सुटका होताच न्यायालयातून बाहेर पडताच नेहमीप्रमाणे नागरिक त्यांच्या भोवती गोळा झाले. काहींनी निवेदने दिलीत, तर काहींनी आपल्या समस्या मांडल्या. पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या राहुटी उपक्रमात आमदार बच्चू कडू परतले. शासकीय यंत्रणाच्या उपस्थितीत नागरिकांच्या तक्रारी ऐकून समस्या सोडविण्यावर ‘राहुटी’मध्ये भर दिला जातो.
न्यायालयाचा आदर करतो. शिक्षेला वरिष्ठ न्यायालयात आव्हान देऊ. जनतेसाठी अशा कितीही शिक्षा झाल्या तरी चालतील. परतवाडा शहरातील अपघातात चौघांचा मृत्यू झाला होता. वैयक्तिक कामासाठी आम्हाला शिक्षा झाली नाही. लोकांसाठी माझा लढा सतत सुरू राहील. एका महिन्याचा अवधी मिळाला असून उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.
– बच्चू कडू, आमदार, अचलपूर मतदारसंघ.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments