Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशमराठा समाजाने मोठ्या भावाप्रमाणे बहुजन समाजाला एकत्र घेऊन नांदावे- छत्रपती संभाजीराजे

मराठा समाजाने मोठ्या भावाप्रमाणे बहुजन समाजाला एकत्र घेऊन नांदावे- छत्रपती संभाजीराजे

नवी दिल्ली भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आणि दलित समाजाला संयमाने वागण्याचे आवाहन केले. मराठा समाज हा मोठा भाऊ आहे, तर दलित समाज हा लहान भाऊ आहे. त्यामुळे मराठा समाजाने एखाद्या मोठ्या भावाप्रमाणे बहुजन समाजाला एकत्र घेऊन नांदले पाहिजे, असे संभाजीराजे यांनी सांगितले.

फुले, शाहू, आंबेडकर यांच्या भूमीत भीमा कोरेगावसारखी घटना घडणे हा प्रकार खूपच दु:खद आहे. महाराष्ट्रासाठी हा काळा दिवस आहे, असे मी मानतो. मात्र, आपण समाजकंटकांच्या समाजात द्वेष पसरवण्याच्या प्रयत्नांना बळी न पडता त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. काही मोजक्या समाजविघातक शक्तींमुळे समाजात तेढ निर्माण होता कामा नये. त्यामुळे लोकांनी संयम आणि शांतता राखून ही फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्यासारख्या विचारी लोकांची भूमी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवावे. भीमा कोरेगावच्या हिंसाचारामागे ज्या समाजविघातक शक्ती असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. ही कारवाई करताना ती व्यक्ती कोणत्या समाजाची आहे, याचा विचार करू नये.

महाराष्ट्राच्या भूमीत यापुढे असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी दिला. याशिवाय, त्यांनी भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला मोठ्या भावाची भूमिका पार पाडण्याचा सल्ला दिला. मराठा समाज हा मोठा भाऊ आहे, तर दलित समाज लहान भाऊ आहे. त्यामुळे मराठा समाजाने संपूर्ण बहुजन समाजाला एकत्र घेऊन नांदावे, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments