Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रवाचाळ बडबड करणार्‍यांना हा निकाल म्हणजे जबरदस्त चपराक;अजित पवारांचा भाजपाला टोला

वाचाळ बडबड करणार्‍यांना हा निकाल म्हणजे जबरदस्त चपराक;अजित पवारांचा भाजपाला टोला

मुंबई l विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत भाजपाला मोठा फटका बसला. नागपूर, पुणे, औरंगाबाद या भाजपाच्या प्रतिष्ठेच्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. मात्र त्याचवेळी त्यांनी भाजपाचाही खास आपल्या शैलीत समाचार घेतला आहे.

पुणे मतदारसंघात तब्बल २० वर्षांनंतर भाजपाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. नेहमी भाजपाला साथ देणाऱ्या पुणेकर मतदारांनी यंदा मात्र राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयी केलं.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अरुण लाड हे ४९ हजार मताधिक्याने विजयी झाले. तर औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतिश चव्हाण ५८ हजार मताधिक्याने विजयी झाले.

अमरावतीची जागा जिंकली असती तर समाधान मिळालं असतं. तिथं जे घडलं त्याचं दुःख असल्याची खंत अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना बोलून दाखवली.

“नागपूर आणि पुण्यात बऱ्याच वर्षांपासून पदवीधर मतदारसंघांमध्ये एका पक्षाची मत्तेदारी होती. मात्र सुशिक्षित वर्ग देखील महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे. पदवीधर, शिक्षक मतदार आमच्या पाठीशी आहेत हे सिद्ध झालं.

बरेच जण वाचाळ बडबड करत होते. मी त्यांची नावं घेऊन कारण नसताना वेळ घालवू इच्छित नाही. मात्र हा निकाल म्हणजे त्या वाचाळविरांना ही फार जबरदस्त चपराक बसलेली आहे. आता लोकांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय हे या निकालांवरुन स्पष्ट झालं आहे,” असं अजित पवार म्हणाले.

पुढे बोलताना अजित पवारांनी या निवडणुकीच्या माध्यमातून तिन्ही पक्षांनी एकत्र येत एक वेगळा राजकीय प्रयोग केला आणि तो यशस्वी झाला याचा सामाधान असल्याची भावना व्यक्त केली.

मी सर्व मतदारांचे मनापासून आभार मानतो. हा एक वेगळा प्रयोग शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरेंनी केला. त्याचं हे यश आहे, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.

“महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय हा आघाडीतील सर्व पक्षांच्या एकजूटीचा विजय आहे. राज्यातील जनतेचा सरकारवरील विश्वास असल्याचे हे प्रतिक आहे.

महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी केल्याबद्दल सर्व मतदारांचे आभार! महाविकास आघाडीचे अन्य उमेदवारही आघाडीवर असून त्यांचा विजय लवकरच जाहीर होईल”, अशा भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments