Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रसरकारविरोधातील एल्गार असाच सुरु ठेवणार -अजित पवार

सरकारविरोधातील एल्गार असाच सुरु ठेवणार -अजित पवार

बीड : आज माझा शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे हल्लाबोल आंदोलन सुरु केले असून जोपर्यंत समाजातील वेगवेगळया घटकाला न्याय मिळत नाही तोपर्यंत सरकारविरोधातील हा एल्गार असाच सुरु ठेवणार असल्याचा इशारा विधीमंडळाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेवराई येथील विराट सभेमध्ये दिला.

आज बीड जिल्हयातील गेवराई तालुक्यामध्ये जगदंबा आयटीआय कॉलेजच्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विराट अशी सभा पार पडली. आमदार अमरसिंह पंडीत आणि युवा नेते विजयराजे पंडीत यांच्या नेतृत्वाखाली ही अभूतपूर्व अशी सभा घेण्यात आली. सुरुवातीला गढी गावापासून विजयराजे पंडीत यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल यात्रेचा हा तिसरा दिवस असून या हल्लाबोल यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला.

या सभेला विधीमंडळ पक्षनेते अजित पवार,प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, आमदार अमरसिंह पंडीत ,महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ,आमदार विक्रम काळे,आमदार सतिष चव्हाण, आमदार रामराव वडकुते, आमदार विदया चव्हाण,आमदार जयदेव गायकवाड, आमदार राजेश टोपे, माजी मंत्री प्रकाश सोळंके, माजी आमदार संजय वाकचौरे,युवक नेते विजयराजे पंडीत,युवा नेते संदीप क्षीरसागर, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील, विदयार्थी अध्यक्ष अजिंक्यराणा पाटील,बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनावणे,युवक जिल्हाध्यक्ष जयसिंग सोळंके,महिला जिल्हाध्यक्षा रेखा फड,गेवराई तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर,ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे,अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष गफार मलिक,सुरेखा ठाकरे,डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, आदींसह अनेक नेते,पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

अजित पवार यांनी या सभेमध्ये तरुण कार्यकर्त्यांमध्ये जान फुंकण्याचे काम केले. त्यांनी आपल्या भाषणामध्ये आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही परंतु जर कुणी आरे ला कारे म्हणत असेल तर त्याला जशाच तसे उत्तर दया असे स्पष्ट करतानाच २०१४ च्या निवडणूकीमध्ये राष्ट्रवादीला दणका दिला तसा दणका देवू नका तर उदयाच्या निवडणूकांमध्ये खासदार आणि सहाच्या सहा आमदार राष्ट्रवादीच्या घडयाळाचे असले पाहिजे असे आवाहन गेवराई आणि मराठवाडयातील जनतेला केले. हे सांगतानाच पक्षाने जनतेच्या मनातील उमेदवार दयावा असेही स्पष्ट केले.

आज देशाची वाटचाल अराजकतेकडे जात आहे. आणीबाणी लागण्याची अवस्था निर्माण झाली आहे की काय अशी भीती जनतेमध्ये निर्माण झाली आहे.ज्याज्यावेळी विकासाचा मुद्दा येतो त्यात्यावेळी राजकीय जोडे बाहेर काढले गेले पाहिजेत.कारण त्यामध्ये सर्वसामान्याच्या विकासाच्या भावना जोडलेल्या असतात असेही अजित पवार म्हणाले.

भाजप-सेनेच्या संसाराला साडेतीन वर्ष झाली तरी त्यांच्या विकासाचा पाळणा हालत नाही अशी परिस्थिती आहे. ते म्हणत आम्ही केलं ते निस्तरत आहेत.अरे किती दिवस असं सांगून काम करत राहणार आहात.किती दिवस पहिल्या सरकारला दोष देत बसणार आहात. याचं आत्मपरिक्षण आणि आत्मचिंतन सरकारने करण्याची गरज असल्याचा सल्ला अजित पवार यांनी यावेळी दिला.

आज आमच्या मराठवाडयामधील मागासलेपण सुधारायला नको,इथे उदयोगधंदे यायला नको.परंतु या सरकारला मराठवाडयाबद्दल आस्थाच राहिलेली नाही असाही आरोप अजित पवार यांनी केला.या बीड जिल्हयाने परळी वगळता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगली साथ दिली असून सध्या महाराष्ट्रातील हवा बदलत आहे. लोक उत्फुर्तपणे बाहेर पडत आहे.सुरुवातील मोदी तरुणांसाठी काही करतील वाटलं होतं परंतु आत्ता या तरुणांना कळून चुकले असून हाच तरुण पेटून उठून रस्त्यावर उतरला आहे असेही अजित पवार म्हणाले.

या सभेमध्ये पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी सरकारच्या दुटप्पी कारभारावर हल्लाबोल केला.तर युवा नेते विजयराजे पंडीत यांनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वाचा चांगला समाचार घेतला. एक आळशी सम्राट आणि दुसरा नटसम्राट अशी उपमा देवून त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी भविष्यात आंदोलन उभारणार असल्याचे स्पष्ट केले. आमदार अमरसिंह पंडीत यांनी आपल्या भाषणामध्ये ज्या मराठवाडयाने भरभरुन दिले त्याच मराठवाडयातील शेतकरी आज होरपळून निघत आहे.मात्र सरकारला मराठवाडयाकडे लक्ष दयायला वेळ नाही असा आरोप केला. साडेतीन वर्षात या सरकारने मराठवाडयामध्ये एकही सिंचनाचा प्रकल्प आणला नाही. मात्र त्याच अजित पवार यांनी पावणे दहा लाख हेक्टर शेती सिंचनाखाली आणून मराठवाडयाला दिलासा दिला होता असेही अमरसिंह पंडीत यांनी सांगितले.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा सरकारचे वाभाडे काढले.कापसाच्या प्रश्नावर आम्ही विधानभवनात आवाज उठवला.बोंडअळीने हैराण झालेल्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी केल्यानंतर जाग आलेल्या सरकारने तुटपंजी भरपाई जाहीर केली मात्र तीही दिलेली नाही त्यामुळे आता भावानो यांच्यातील अशा अळीला ठेचून काढण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हल्लाबोलची ही ठिणगी पडली असून ती ठिणगी तशीच पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्न करुया असे आवाहन मुंडे यांनी केले.

या सभेमध्ये अजित पवार यांच्या भाषणाच्या अगोदर इतर पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आज हल्लाबोलच्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सभेलाही जनतेने उत्स्र्फुर्तपणे प्रतिसाद दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments