Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्र९८ लाखांच्या फसवणूक प्रकरणी आंध्रा बॅंकेच्या ऑडिटरला बेड्या

९८ लाखांच्या फसवणूक प्रकरणी आंध्रा बॅंकेच्या ऑडिटरला बेड्या

महत्वाचे…
१.बनावट कोटेशन व संपत्तीचे बनावट दस्ताऐवज असतानाही निखारे याने वरिष्ठांकडे सकारात्मक अहवाल पाठविला २. १ कोटी ४ लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणातही तो आरोपी आहे. ३. २०१६ मध्ये सर्व प्रकरण घडले होते.


अमरावती : बनावट दस्तऐवजाद्वारे ९८ लाखांचे कर्ज मंजूर करताना वरिष्ठांकडे सकारात्मक अहवाल पाठविणा-या आंध्रा बँकेच्या तत्कालीन व्यवस्थापकाला अमरावती पोलिसांनी शुक्रवारी दुपारी अटक केली. यादव पंढरी निखारे (४९, रा. रामकृष्ण सोसायटी, नरेंद्रनगर, नागपूर) असे आरोपीचे नाव आहे. यादव निखारे सद्यस्थितीत बँकेत नागपूर येथे डिटर आहे. 

यादव निखारे २०१६ मध्ये आंध्रा बँकेच्या अमरावती येथे इर्विन चौक शाखेत व्यवस्थापक होता. त्यावेळी आकाश शिरभाते (४५, रा. विलासनगर) याने आई करुणा शिरभाते, रवींद्र गंद्रे, रोहन भोपळे यांना सोबत घेऊन चिंतामणी प्रिंटिंग प्रेसच्या नावाखाली प्रुडंट कंपनीकडून मशिनरी खरेदी करण्यासाठी आंध्रा बँकेतून ९८ लाखांचे बनावट दस्तऐवजावरून कर्ज घेतले होते. हा प्रकार बँक व्यवस्थापनाच्या निदर्शनास आल्यावर २७ जुलै २०१६ रोजी आंध्रा बँकेचे शाखाधिकारी फणी लक्ष्मीकांत शास्त्री पशुपर्ती (३०) यांनी कोतवाली ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी वरील चौघांविरुद्ध भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, ४६७, ४७१, १२०(ब), ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. आकाश शिरभातेला अटक केली, तर त्याची आई करुणा शिरभाते यांनी अटकपूर्व जामीन मिळविला होता. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्यावर पोलिसांनी रवींद्र गंद्रे व रोहन भोपळे यांना अटक केली. सद्यस्थितीत ते जामिनावर बाहेर आहेत.
दरम्यान, पोलीस चौकशीत तत्कालीन बँक व्यवस्थापक यादव निखारेचाही सहभाग असल्याचे पुढे आले. बनावट कोटेशन व संपत्तीचे बनावट दस्ताऐवज सादर केले असतानाही निखारे याने वरिष्ठांकडे सकारात्मक अहवाल पाठवून ९८ लाखांचे कर्ज दिल्याचे निदर्शनास आले. त्याआधारे पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक व आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक अतुल वर, उपनिरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस कर्मचारी राजेंद्र शेंडे, ईश्वर चक्रे व शैलेश रोंघे यांनी निखारे याला कॅम्प परिसरातून अटक केली. निखारेला शुक्रवारी दुपारी अमरावती न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली.
एक कोटीच्या फ्रॉडमध्ये अटकपूर्व जामीन
यादव निखारेकडे महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश व छत्तीसगढ येथील कामांची जबाबदारी आहे. अमरावतीत व्यवस्थापक असताना १ कोटी ४ लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणातही तो आरोपी आहे. त्यामध्ये अटकपूर्व जामीन मिळविला आहे.
२ ते १० टक्के कमिशन 
कर्जवाटप करताना निखारे २ ते १० टक्क्यांपर्यंत कमिशन घेत असल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले. कर्जाच्या रकमेवर कमिशन अवलंबून राहायचे.
पीआय अणेंची टाळाटाळ
पोलीस निरीक्षक गणेश अणे हे आर्थिक गुन्हे शाखेत असताना त्यांच्याकडे या फसवणूक प्रकरणाचा तपास होता. मात्र, त्यांनी आरोपीस अटक करण्याबाबत टाळाटाळ केली होती, असा खुलासा पोलीस आयुक्तांनी माध्यमासमोर केला.
 जन्मठेपेची तरतूद
लोकसेवक अथवा बँक व्यावसायिक किंवा एजन्ट यांनी फौजदारीस पात्र न्यासभंग केल्यास, त्यांना आजन्म किंवा दहा वर्षांच्या कारावासाची तरतूद कायद्यात आहे.
बँक अधिका-यांना दिला होता इशारा
पोलीस आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी बँक अधिका-यांना कारभार सुधारण्याविषयी अधिका-यांना सूचना व सक्त ताकीद दिली. यानंतर शुक्रवारी यादव निखारेला अटक करण्यात आली. पुढेही बँकेच्या फसवणूक प्रकरणात अधिकारी व कर्मचा-यांचा सहभाग तपासला जाणार असून, दोषी अधिका-यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments