Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतरही फाईलवरचे शेरे बदलले जातात : आशिष शेलार

मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतरही फाईलवरचे शेरे बदलले जातात : आशिष शेलार

मुंबई l मुंबई, ठाणे परिसरातील राज्य सरकारने दिलेल्या जमिनीवरील जुन्या सोसायट्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी फडणवीस सरकारने एक निर्णय घेतला होता. त्या निर्णयाला ठाकरे सरकारने स्थगिती दिली होती. परंतु आता स्थगिती उठवण्यात आली. या मुद्द्यावरून ट्विट करताना भाजपा आमदार आशिष शेलार  यांनी उद्धव ठाकरे  यांना टोला लगावला.

मुंबईतील लिजवरील जमिनीवर असणाऱ्या गृहनिर्माण संस्थांमधील मध्यमवर्गीयांना दिलासा देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने क्लास २ च्या मालमत्ता क्लास १ मध्ये फ्री होल्ड करण्याचा निर्णय घेतला. त्याला आघाडी सरकारने नुकतीच स्थगिती दिली होती.

आम्ही त्याला विरोध केला होता. नुकत्याच आलेल्या बातमीनुसार मा. मुख्यमंत्र्यांनी ही स्थगिती उठवली. आम्ही या निर्णयाचे स्वागतच करतो. पण का स्थगिती दिली होती देव जाणे?”, असे त्यांनी लिहीले. याशिवाय, “स्थगिती उठवली ती महसूल खात्याला माहित आहे ना? (कारण) या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतरही फाईलवरचे शेरे बदलले जातात म्हणून विचारले!”, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

मुंबई व परिसरात गृहनिर्माणासाठी राज्य शासनाकडून हजारो भूखंड नागरिकांच्या सोसायट्यांना पूर्वी देण्यात आले होते. त्या जमिनींवरील सोसायटीमधील फ्लॅट विकायचा असल्यास किंवा जुन्या इमारतींचा पुनर्विकास करायचा असल्यास खूप किचकट प्रक्रिया करावी लागत होती. या समस्येवर तोडगा म्हणून फडणवीस सरकारने या जमिनी भोगवटादार वर्ग दोनमधून वर्ग एकमध्ये करण्यास ८ मार्च २०१९ रोजी परवानगी दिली होती.

या निर्णयावर ठाकरे सरकारने आधी स्थगिती दिली आणि नंतर स्थगिती उठवली. याच पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी ट्विट केले.दरम्यान, या मुद्द्यावर काही दिवसांपूर्वी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलदेखील आक्रमक झाले होते. स्थगितीबाबत योग्य निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments