मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा!

- Advertisement -

पारनेर: दिवाळीपूर्वी कर्जमाफी देण्याची घोषणा करणा-या सरकारकडून अद्याप शेतक-यांचे कर्म माफ करण्यात आलेले नाही. सरकारच्या शेतकरीविरोधी भूमिकेमुळेच शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत़ त्यामुळे सरकारविरोधात बलिप्रतिपदेच्या दिवशी भूमिपुत्र शेतकरी संघटना सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहे, अशी माहिती संघटनेचे प्रवक्ते अनिल देठे यांनी दिली.

संघटनेने म्हटले आहे, राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यात हजारो शेतक-यांनी आत्महत्या केलेल्या असून अद्यापही शेतक-यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे व हजारो शेतकरी कर्जबाजारी झालेले आहेत. त्यामुळे शेतक-यांनी १ जून रोजी ऐतिहासिक शेतकरी संप करून राज्यसरकारकडे सरसकट कर्जमाफीची व डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणी केली होती. राज्य सरकारने शेतकरी संपाची दखल घेत शेतक-यांना दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा करत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची घोषणा करुन दिवाळीपूर्वी सर्व शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ देऊ असे जाहीर केले होते. तथापि राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या योजनेचा लाभ दिवाळी दोन दिवसांवर आली तरी मिळाला नसल्याने या सरकारने राज्यातील तमाम शेतकरी बांधवांची घोर फसवणूक केली आहे. शेतक-यांची फसवणूक व शेतकरी बांधवांच्या आत्महत्येस राज्याचे मुख्यमंत्री व त्यांचे सर्व सहकारी मंत्री जबाबदार असल्याने मुख्यमंत्र्यांवर फसवणुकीचा व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटना बलिप्रतिपदेच्या औचित्यावर बळीराजाची मिरवणूक काढून पारनेर पोलीस ठाण्यात सरकारवर गुन्हा दाखल करणार असल्याचे संघटनेचे प्रवक्ते अनिल देठे पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -