Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeकोंकणठाणेमिरा-भाईंदर-वसई-विरार परिसरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची निर्मिती

मिरा-भाईंदर-वसई-विरार परिसरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची निर्मिती

मिरा-भाईंदर-वसई-विरार परिसरातील वाढत्या लोकसंख्येला पुरेशा प्रमाणात सुरक्षितता देण्यासह कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी या परिसरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ठाणे ग्रामीण आणि पालघर पोलीस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्राचे विभाजन करून हे नवे आयुक्तालय तयार करण्यात येणार आहे.

मिरा-भाईंदर आणि वसई-विरार महापालिका हद्दीतील वाढते औद्योगीकरण आणि अस्तित्वातील छोट्या-मोठ्या उद्योगधंद्यांतील वाढीमुळे या परिसरात नागरी, ग्रामीण आणि कामगारांच्या वसाहतींमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. 2011 च्या जनगणनेनुसार या भागाची लोकसंख्या 20 लाख 46 हजार इतकी होती. त्यात वाढ होऊन मे 2019 पर्यंत ती अंदाजे 44 लाख 67 हजार इतकी झाली आहे. वाढत्या लोकसंख्येला सुरक्षितता प्रदान करण्याबरोबरच येथील गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यासाठी या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस मनुष्यबळाची आवश्यकता होती. त्यानुसार नवीन आयुक्तालय निर्मितीचा निर्णय घेण्यात आला.

आजच्या निर्णयानुसार नवीन आयुक्तालयांतर्गत 4708 पदांची स्थापना करण्यात येणार आहे. त्यासाठी ठाणे ग्रामीण कार्यक्षेत्रातील 1006, पालघर कार्यक्षेत्रातील 1165 आणि इतर पोलीस घटकांतून 317 अशी एकूण 2488 पदे वर्ग करण्यात येणार आहेत. तसेच विविध संवर्गातील 2220 पदांची नव्याने निर्मिती करण्यात येणार आहे. या नवनिर्मित पोलीस आयुक्तालयांतर्गत येणारे कार्यक्षेत्र अपर पोलीस महासंचालक दर्जाच्या पोलीस आयुक्तांच्या अधिपत्याखाली राहणार आहे. पोलीस आयुक्तालयाच्या निर्मितीसाठी आवश्यक पदनिर्मिती, वाहने आणि पोलीस ठाण्यांची निर्मिती यासाठी लागणाऱ्या 130 कोटी 99 लाख 58 हजार 23 इतक्या आवर्ती आणि 43 कोटी 79 लाख 30 हजार 532 इतक्या अनावर्ती खर्चासही मंजुरी देण्यात आली.

ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रामधील मिरारोड, काशिमिरा, नयानगर, नवघर, भाईंदर, उत्तन अशी 6 पोलीस ठाणी, पालघर पोलीस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रामधील वसई, विरार, नालासोपारा, माणिकपूर, वालीव, अर्नाळा, तुळींज अशी 7 पोलीस ठाणी अशा प्रकारे 13 पोलीस ठाणी नवीन आयुक्तालयात वर्ग करण्यात येतील. तसेच काशीगाव, खारीगाव, पेल्हार, आचोळा, मांडवी, बोळींज, नायगाव अशी 7 नवीन पोलीस ठाणी नव्याने निर्माण करण्यात येणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments