मनसेचं परप्रांतीय मासे विक्रेत्या विरोधात ‘खळ्ळ-खटॅक’

- Advertisement -

ठाणे: गेल्या काही दिवसांत मराठी भाषा आणि भूमिपुत्र या दोन मुद्द्यांवरून पुन्हा आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी आज ठाण्यात परप्रांतीय मासे विक्रेत्यांना मारहाण केली. कोळी समाज आणि मराठी माणसालाच महाराष्ट्रात मासे विकण्याचा हक्क मिळाला पाहिजे, असं त्यांनी ठणकावलं.

एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर, रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाज दिला होता. त्यानंतर मनसैनिकांनी ठिकठिकाणी आपल्या स्टाइलनं आंदोलन केलं. अनेक रेल्वे स्टेशनांबाहेर ‘खळ्ळ-खटॅक’ करून त्यांनी बेकायदेशीर फेरीवाल्यांना पळवून लावलं होतं. रेल्वे स्टेशनांच्या आसपास १५० मीटर परिसरात फेरीवाल्यांना बसता येणार नाही, असा निकाल न्यायालयाने दिल्यामुळे मनसेला नवं बळच मिळालंय. त्यानंतर, ठाण्याच्या सभेत राज ठाकरे यांनी भूमिपुत्रांचा मुद्दा ठळकपणे मांडला होता. पदपथावर बसून व्यवसाय करण्याचा हक्क हा मराठी माणसाचाच असल्याचा दावा त्यांनी केला होता. तोच धागा पकडून, ठाण्यातील मनसैनिकांनी आज कोलबाड इथे परप्रांतीय मासे विक्रेत्यांना मारहाण करत हाकलून लावलंय.

- Advertisement -