Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईशेतकऱ्यांचं एल्गार! आज राजभवनाला शेतक-यांचा घेराव

शेतकऱ्यांचं एल्गार! आज राजभवनाला शेतक-यांचा घेराव

केंद्र सरकारनं लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात 60 दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरु

मुंबई: अखिल भारतीय किसान सभेच्या मोर्चाचं वादळ बईत पोहोचलं आहे. या मोर्चामध्ये ट्रॅक्टर, जीप इत्यादी वाहनांसह हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. आज सोमवार, 25 जानेवारीला हा मोर्चा राजभवनावर  धडकणार आहे. केंद्र सरकारनं लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या 60 दिवसांपासून दिल्लींच्या वेशींवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला आहे. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधील शेतकरी मोठ्या संख्येने या महामोर्चात सहभागी झालेले आहेत.

या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आझाद मैदानात शेतकऱ्यांचे तीन दिवसांचे धरणे आंदोलन असणार आहे. हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले असून हे लाल वादळ नाशिक कसारा घाटामार्गे शहापूर तालुक्यातून मुंबईत दाखल झालं.

या मोर्चासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यातून हजारो शेतकरी सहभागी होत असल्याची माहिती किसान सभेच्या वतीनं देण्यात आली आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर मुंबईतील आझाद मैदानात देखील पोलीस प्रशासनाकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी मुंबई पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाच्या अनेक तुकड्या देखील मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाल्या आहेत.

शरद पवारांसह महाविकास आघाडीतील नेते आंदोलनात होणार सहभागी

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मुंबईच्या आझाद मैदानावर शेतकरी आंदोलनास पाठिंबा देणाऱ्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्यमंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीनं काही शेतकरी संघटनांनी घेतलेल्या निदर्शनास पाठिंबा दर्शविला जाईल. नवाब मलिक पुढे म्हणाले की, शेतकर्‍यांच्या वतीने नवीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ राजभवनाकडे मोर्चा काढण्यात येईल. यापूर्वीचं शरद पवार यांनी शेतीशी संबंधित या कायद्यांना विरोध दर्शविला होता. केंद्र सरकारने हे कायदे मागे घेण्याची मागणी त्यांनी केली होती.

मुंबईत शनिवारी रात्रीपासून मोठ्या प्रमाणात पोलिसांची नाकाबंदी

मुंबईत राज्याच्या विविध भागातून शेतकऱ्यांचा मोर्चा दाखल झाला. त्यातच प्रजासत्ताक दिनही दोन दिवसांवर आहे. यामुळे मुंबईत घातपाताची ही शक्यता असल्यानं मुंबई पोलीस अलर्टवर आहेत. परवा रात्रीपासूनच यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर मोठी नाकाबंदी करण्यात आली आहे.

सशस्त्र पोलिसांसह, रिफ्लेकटर, एलईडी लाईट आणि अत्याधुनिक बेरिकेटिंगसह मुंबईच्या घाटकोपर अंधेरी लिंक रोड, एलबीएस मार्ग, घाटकोपर मानखुर्द लिंक रोड, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग आणि मुंबईच्या सर्वच वेशींवर मोठ्या प्रमाणत बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबईत प्रवेश करणारे प्रत्येक वाहन तपासले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments