आज पासून मुंबै बँकेच्या कारभाराची झाडाझडती

- Advertisement -

महत्वाचे…
१. दरेकर मनमानी कारभार करत असल्याचा शिवसेना-राष्ट्रवादीच्या संचालकांचा आरोप २. दोन वर्षांतील कारभाराचे नाबार्डचे पथक झाडाझडती घेणार ३. बँकेच्या मुख्यालयाने सर्व शाखा आणि अधिकाऱ्यांनाही तयार राहण्याच्या स्पष्ट सूचना


मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (मुंबै) पदाधिकाऱ्यांनी केलेल्या नियमबाह्य़ कर्जवाटपाची, तसेच मनमानी कारभाराची राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड)ने गंभीर दखल घेतली आहे. या बँकेच्या गेल्या दोन वर्षांतील कारभाराची झाडाझडती घेण्यासाठी नाबार्डचे पथक आज, सोमवारी बँकेत दाखल होणार असल्याचे समजते. त्यामुळे बँकेच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच प्रशासनाचे धाबे दणाणले आहे.

- Advertisement -

मुंबै बँकेवर सध्या भाजपची सत्ता असून, बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप शिवसेना-राष्ट्रवादीच्या संचालकांनी केला आहे. नियमानुसार जिल्हा सहकारी बँकांच्या कारभारावर नाबार्ड देखरेख ठेवते आणि त्यांच्या अहवालानुसारच राज्य सरकार किंवा रिझव्र्ह बँक जिल्हा बँकावर कारवाई करते. यापूर्वीही बँकेत भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन चौकशी सुरु होती. मात्र, बँकेवर भाजपची सत्ता आल्यानंतर संचालक मंडळास अभय मिळाल्याचे बोलले जाते. पहिल्या चौकशीतून सहीसलामत बाहेर पडल्यानंतर संचालक मंडळाने पुन्हा मनमानी कारभार सुरू केला असून, त्यातूनच बँकेतील नवीन घोटाळ्यांच्या सुरस कथा बाहेर येऊ लागल्या आहेत. पदाधिकाऱ्यांचा आशीर्वाद आणि अधिकाऱ्यांची साथ याच्या माध्यमातून बँकेत पदाधिकाऱ्यांच्या सग्यासोयऱ्यांनीच केलेला बनावट कर्ज प्रकरण घोटाळा, राजकारण्यांच्या संस्थांना दिलेली नियमबाह्य़ कर्जे, सिंचन घोटाळ्यातील आरोपी कंपनीस नियमबाह्यपणे दिलेले कर्ज, बनावट कंपनीस कर्ज देण्याचा घाट, बँकेच्या मुख्यालयात पुरातन वास्तूमध्ये करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम आदी प्रकरणे काही दिवसांपूर्वीच ‘लोकसत्ता’ने उघडकीस आणली होती. त्याची गंभीर दखल घेत नाबार्डने तातडीने या बँकेची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाबार्डच्या नियोजनानुसार फेब्रुवारी महिन्यात बँकेची नियमित तपासणी होणार होती. मात्र, बँकेच्या कारभाराची नवनवीन प्रकरणे बाहेर येऊ लागलाच नाबार्डने तातडीने आपला मोर्चा मुंबै बँकेकडे वळविला आहे. उद्यापासून पुढील १५ दिवस नाबार्डचे अधिकारी या बँकेच्या कारभाराची झाडाझडती घेणार आहेत. त्यात कर्जप्रकरणे मंजूर करणे, प्रशासकीय अनियमितात तसेच संचालक मंडळाने प्रशासनाच्या भूमिकेविरोधात जाऊन घेतलेले निर्णय यांचीही तपासणी होणार आहे. त्यानुसार बँकेच्या मुख्यालयाने सर्व शाखा आणि अधिकाऱ्यांनाही तयार राहण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तपासणीतून बँकेची अनेक गुपिते उघड होण्याच्या भितीने संचालक मंडळाबरोबरच त्यांना मदत करणारे अधिकारीही धास्तावले.

- Advertisement -