राणे यांच्या रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी ७ डिसेंबरला

- Advertisement -

महत्वाचे…
१.२९ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २. गुरूवार दिनांक ७ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ४ या वेळेत मतदान ३. सायंकाळी ५ वाजता मतमोजणीला सुरूवात.


मुंबई – माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी ७ डिसेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी याबाबतचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणुक होत आहे. विधानसभेतील सदस्य या निवडणुकीसाठी मतदान करतील. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २० नोव्हेंबरला या पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येणार असून,२९ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. गुरूवार दिनांक ७ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ४ या वेळेत मतदान घेण्यात येवून सायंकाळी ५ वाजता मतमोजणीला सुरूवात होईल.

- Advertisement -

राणे यांच्या मंत्रिमंडळ समावेशाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली असतानाच विधान परिषदेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. राणे यांनी थेट भाजपात प्रवेश करण्याऎवजी स्वतंत्र पक्ष काढला आहे. त्यानंतर त्यांचा स्वाभिमान पक्ष औपचारिकपणे भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील झाला आहे. या रिक्त जागेसाठी विरोधकांकडून उमेदवार दिला जाण्याची शक्यता कमी आहे. शिवाय विधानसभेतील संख्याबळ पाहता भाजपाच्या पाठिंब्याने नारायण राणे पुन्हा एकदा परिषदेवर निवडून येण्यात कोणतीच अडचण नाही.

विधानसभेत असणारे पक्षीय बलाबल पुढीलप्रमाणे-
भाजपा -१२२ , शिवसेना – ६३, काँग्रेस – ४२, राष्ट्रवादी – ४१, शेकाप – ३, बविआ – ३, एमआयएम – २, अपक्ष – ७, सपा -१, मनसे – १, रासपा – १, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीया – १

- Advertisement -